पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांचा होणार लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:48 AM2021-02-18T04:48:48+5:302021-02-18T04:48:48+5:30
सांगली : वर्षानुवर्षे पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या वाहनांचा आता प्रशासनातर्फे लिलाव काढण्यात येणार आहे. बेवारस स्थितीत पडून असलेल्या ...
सांगली : वर्षानुवर्षे पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या वाहनांचा आता प्रशासनातर्फे लिलाव काढण्यात येणार आहे. बेवारस स्थितीत पडून असलेल्या दुचाकी, चारचाकी, तीनचाकी अशा ३४८ वाहनांची लिलाव प्रक्रिया होणार असल्याने वाहनांच्या मूळ मालकांनी मालकी हक्क, वारसा, तारण याबाबतचे मूळ दस्ताऐवज सादर करून वाहन घेऊन जावे अन्यथा त्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
शहरासह जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेल्या दुचाकीसह इतर वाहने खूप वर्षांपासून लावून ठेवलेली आहेत. यातील अनेक वाहनधारकांनी वाहन ताब्यात घेण्याबाबत अनास्था दाखवली आहे. त्यात अपघातासह गुन्ह्यातील वाहन घरी नको या मानसिकतेमुळेही वाहने पडून आहेत. पण यामुळे पोलीस ठाण्यांना बकालवस्था आली आहे. शिवाय या वाहनांची गणना, सुरक्षेचाही ताण वाढत आहे.
पोलीस ठाण्यांचे सुशोभिकरणासह इतर उपक्रम राबविण्यासही अडचणी येत आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी बेवारस असलेली व ठाण्यात पडून असलेली वाहने मूळ मालकांना परत देणे किंवा त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ३०३ दुचाकी, १३ तीनचाकी, १८ चारचाकी आणि २ सहाचाकी अशा सुमारे ३४८ वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहेे.
चौकट
जिल्ह्यातील सांगली शहर, ग्रामीण, विश्रामबाग, संजयनगर, मिरज शहर, ग्रामीण, कुपवाड, महात्मा गांधी चौकी, इस्लामपूर, आष्टा, शिराळा, कुरळप, कासेगाव, कोकरूड, तासगाव, कुंडल, पलूस, भिलवडी, विटा, आटपाडी, कडेगाव, चिंचणी वांगी, जत, कवठेमहांकाळ, उमदी, वाहतूक शाखा, एलसीबी अशा २८ ठिकाणी असलेली वाहने एकतर मूळ मालकांना परत देण्यात येतील किंवा त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.