वसंतदादा बँकेच्या मालमत्तांचा लिलाव-मुंबईच्या इमारतीचा समावेश : सहा इमारती विकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:42 PM2019-07-03T23:42:15+5:302019-07-03T23:43:34+5:30
अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या मुख्यालय इमारतीच्या लिलावाचा प्रस्ताव सहकार विभागाकडे लटकला असून
सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या मुख्यालय इमारतीच्या लिलावाचा प्रस्ताव सहकार विभागाकडे लटकला असून, त्यापूर्वी बॅँकेच्या सहा इमारतींच्या फेरलिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
राज्यात वसंतदादा बॅँकेच्या एकूण १० मालकीच्या इमारती आहेत. त्यातील आठ मालमत्तांचा लिलाव यापूर्वी अवसायकांमार्फत काढण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यात याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. बॅँकेच्या सांगलीतील वखारभाग धर्मरत्न कॉम्प्लेक्स, वखारभाग गांधी बिल्डिंग, सराफ कट्टा, मार्केट यार्ड या इमारतींसह मिरजेतील स्टेशन रोड व लक्ष्मी मार्केटमधील दोन इमारतींसह अंकलखोप (ता. पलूस) व चिंचणी (ता. तासगाव) येथील इमारतींचा या लिलाव प्रक्रियेत समावेश होता. सांगली मार्केट यार्डातील लिलाव प्रक्रियेस मार्केट कमिटीच्या संचालकांनी हरकत घेतल्याने ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
अन्य इमारतींपैकी वखारभागातील दोन, सराफ कट्टा व मिरजेतील स्टेशन रोडच्या इमारतीसाठी एकही निविदा दाखल झाली नव्हती. मिरजेच्या लक्ष्मी मार्केटजवळील बॅँक इमारतीसाठी एक निविदा दाखल झाली होती, मात्र ती वाजवी किमतीपेक्षा कमी असल्याने, ती प्रक्रिया रद्द केली होती.
आता मुंबईच्या परेल येथील इमारतीसह उर्वरित सहा इमारतींच्या लिलावाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. वखारभागातील धर्मरत्न कॉम्प्लेक्समधील कार्यालय, सांगली पेठभाग, मिरज लक्ष्मी मार्केट व मिरज स्टेशन रोडवरील इमारत, सराफ कट्टा येथील इमारत, तसेच चिंचणी (ता. तासगाव) येथील पेठभागातील इमारतीचा लिलाव केला जाणार आहे. २५ जुलैपर्यंत ई-निविदा दाखल करण्याची मुदत असून, ३0 जुलै रोजी कोल्हापूर येथील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात ई-निविदा उघडण्यात येणार आहेत. त्यानंतर निविदांबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
सांगलीच्या वखारभाग येथील इमारतीसाठी १ कोटी २० लाख ९४ हजार पायाभूत किंमत असून, त्यासाठी १ लाख २० हजार बयाणा रक्कम निश्चित केली आहे. पेठभाग येथील इमारतीसाठी ६४ लाख ९ हजार पायाभूत किंमत व ६४ हजार बयाणा रक्कम, लक्ष्मी मार्केटमधील इमारतीसाठी १ कोटी ३१ लाख ३३ हजार रुपये पायाभूत किंमत व १ लाख ३१ हजार बयाणा, तर मिरज स्टेशन रोडवरील इमारतीसाठी ७९ लाख ६ हजार इतकी पायाभूत किंमत व ७९ हजार बयाणा रक्कम निश्चित केली आहे. या फेरलिलावास प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
मुंबईच्या मालमत्तेची : सर्वाधिक किंमत
मुंबईच्या परेल येथील इमारतीची पायाभूत किंमत ८ कोटी ७१ लाख ६५ हजार इतकी ठेवण्यात आली असून त्यासाठी ८ लाख ७२ हजार बयाणा रक्कम निश्चित केली आहे. लिलाव प्रक्रियेतील सर्वाधिक पायाभूत किंमत असलेली ही इमारत आहे.