‘वसंतदादा’च्या कर्जदारांचा लिलाव

By admin | Published: November 17, 2015 11:32 PM2015-11-17T23:32:17+5:302015-11-18T00:03:52+5:30

१९ कोटींची वसुली होणार : पाच जामीनदारांनाही बजाविल्या नोटिसा

Auction of Vasantdada's borrowers | ‘वसंतदादा’च्या कर्जदारांचा लिलाव

‘वसंतदादा’च्या कर्जदारांचा लिलाव

Next

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या थकित कर्जदारांच्या स्थावर मालमत्ता विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १८ कोटी ८८ लाख ५८ हजार ५२५ रुपयांच्या वसुलीसाठी बॅँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी मंगळवारी २० कर्जदारांच्या मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेची नोटीस प्रसिद्ध केली आहे. तसेच जामीनदारांच्या मालमत्तांची अपसेट प्राईस (वाजवी किंमत) ठरविण्याचा प्रस्तावही जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आला आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँक अवसायनात काढण्यात आली आहे. बॅँकेचे एकूण २ हजार ७०० कर्जदार आहेत. यापैकी १०२० कर्जदार गॅस अनुदानातील, तर २०० कर्जदार हे तोडणी वाहतूक करणारे आहेत. उर्वरित १४०० कर्जदारांकडून वसुलीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. त्यासाठी त्यांना नोटिसा बजावणे, मालमत्तांच्या वाजवी किमतीचे प्रस्ताव पाठवून मालमत्ता लिलावात काढणे, अशी प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी बॅँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी २० बड्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्तीची नोटीस प्रसिद्ध केली आहे. यामध्ये नगरसेवक, बिल्डर्स, व्यापारी, संस्था यांचा समावेश आहे.
कर्जदारांबरोबरच पाच जामीनदारांनाही जाहीर समन्स बजावण्यात आले आहे. नोटिसा देऊनही जामीनदार गैरहजर राहिल्याने त्यांच्याही मालमत्तांच्या लिलावासाठी प्रयत्न चालू झाले आहेत. या पाचही जामीनदारांच्या मालमत्तांची वाजवी किंमत ठरविण्याचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे सादर झाला आहे. यावरील सुनावणी ३० नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्हा उपनिबंधकांसमोर होणार आहे. त्यावेळी संबंधित जामीनदारांना लेखी अथवा तोंडी म्हणणे मांडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जामीनदार किंवा कर्जदार पुन्हा गैरहजर राहिले तर, एकतर्फी निकाल दिला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
कर्जदार व जामीनदारांनी लिलावापूर्वी बॅँकेशी कर्जाबाबत संपर्क साधला व रक्कम भरण्याची तयारी दर्शविली तर, त्यांना एकरकमी परतफेड योजनेचा लाभ मिळू शकतो. सध्या बॅँकेच्या कर्ज वसुलीसाठी ही योजना जाहीर झाली आहे. एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत व्याजात ८ टक्के सवलत दिली जाणार आहे. येत्या ३१ मार्च २०१६ रोजी ही एकरकमी परतफेड योजना बंद होणार असल्याने कर्जदारांसाठी शेवटच्या चार महिन्यांचीच मुदत आहे.
सध्याच्या लिलाव प्रक्रियेपूर्वी कर्जदारांनी संपर्क साधला तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. अन्यथा मालमत्तांची विक्री करण्यात येणार आहे. प्रशासकांनी कारवाईचा बडगा उगारल्याने कर्जदारांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)


बँकेची धडपड : विमा कंपनीला परत केले १३० कोटी
एक लाखापर्यंतच्या ठेवीदारांना दिलेल्या विमा संरक्षणाअंतर्गत यापूर्वी विमा कंपनीने १६० कोटी रुपये दिले होते. संरक्षित ठेवीदारांचे पैसे त्यांना परत केले आहेत. बॅँकेतील वसुली अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वसुलीतून १३० कोटी रुपये विमा कंपनीला परत केले आहेत. आता कंपनीला ३० कोटी रुपये द्यायचे आहेत. कंपनीचे देणे भागविल्याशिवाय अन्य ठेवीदारांच्या ठेवी परत करणे बॅँकेला शक्य नाही. त्यामुळे सध्या ३० कोटी रुपये परत करण्यासाठी बॅँकेची धडपड सुरू आहे.


यांच्या
मालमत्तांचा होणार
लिलाव

Web Title: Auction of Vasantdada's borrowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.