महापालिकेच्या सर्वच वीज बिलाचे ऑडिट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:02+5:302021-06-23T04:19:02+5:30
सांगली : महापालिकेच्या वीज बिलात साडेपाच कोटीचा घोटाळा उघडकीस आला आहे. हा घोटाळा केवळ पथदिव्यांच्या बिलातील आहे. महापालिकेच्या विविध ...
सांगली : महापालिकेच्या वीज बिलात साडेपाच कोटीचा घोटाळा उघडकीस आला आहे. हा घोटाळा केवळ पथदिव्यांच्या बिलातील आहे. महापालिकेच्या विविध कार्यालयातील बिलांची पडताळणी करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने सर्वच वीज बिलांचे ऑडिट करावे, अशी मागणी नगरसेवक संतोष पाटील व नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली.
महापालिकेच्या वीज बिलात २०१५ पासून साडेपाच कोटीचा घोटाळा झाला आहे. महावितरण कंपनीने या घोटाळ्यातून अंग काढून घेतले आहे. महावितरणकडून सही-शिक्क्यानिशी आलेल्या बिलात महापालिकेची कुठेच थकबाकी दिसून येत नाही, तर स्थिर आकारात वाढ केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, असे पत्र आयुक्त नितीन कापडणीस यांनी जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांना दिले आहे. तसेच विधी व न्याय विभागाकडे विशेष लेखा परीक्षणाची मागणी केली आहे.
दरम्यान, साडेपाच कोटीचा घोटाळा केवळ पथदिव्यांच्या बिलातील आहे. महापालिका मुख्यालय, पाणीपुरवठा, विविध विभागीय कार्यालये अशांच्या बिलाचीही तपासणी करण्याची गरज आहे. या बिलातही घोटाळा झाल्याची शक्यता आहे. त्यासाठी आयुक्तांकडे मागणी केल्याचे पाटील व साखळकर यांनी सांगितले.