महापालिकेच्या पाच वर्षांतील वीज बिलाचे लेखापरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:27 AM2021-04-16T04:27:20+5:302021-04-16T04:27:20+5:30
सांगली : महापालिकेतील वीज बिल घोटाळ्याप्रकरणी नागरिक जागृती मंचने केलेल्या मागणीनुसार गेल्या पाच वर्षांतील वीज बिलाचे विशेष लेखापरीक्षण करण्यात ...
सांगली : महापालिकेतील वीज बिल घोटाळ्याप्रकरणी नागरिक जागृती मंचने केलेल्या मागणीनुसार गेल्या पाच वर्षांतील वीज बिलाचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येणार असल्याचे उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगितले. तसेच महावितरणकडे भरण्यात आलेली जादा रक्कमही वसूल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तेरा अधिकारी, कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या वीज बिल घोटाळ्याबाबत नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली होती. या मागणीबाबत उपायुक्त रोकडे यांनी मंचला पत्र पाठवून, आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती दिली. यात म्हटले आहे, महापालिकेच्या पथदिव्यांच्या मासिक बिलात अनियमितता असल्याचे सप्टेंबर २०२० मध्ये उघडकीस आले. त्यानुसार प्राथमिक चौकशी करून आयुक्तांना अहवाल सादर केला. एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीत १ कोटी २९ लाख ९५ हजार ८९८ रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी विद्युत, लेखा विभाग, लेखापरीक्षण विभागाकडील १७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. आयुक्तांनी संबंधीत कर्मचाऱ्यांच्या पगारातून अपहाराची ३० टक्केप्रमाणे दरमहा रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या कारवाईला औद्योगिक न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
वीज बिल घोटाळ्याप्रकरणी महापालिकेच्या ११ कायम कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे, तर प्रतिनियुक्तीवरील दोन अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव लेखा व कोषागार संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे. विद्युत विभागाच्या गेल्या ५ वर्षांच्या कामाचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. यासाठी सनदी लेखापाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या लेखापरीक्षणानंतर निश्चित होणारी अपहाराची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे. तसेच महावितरणकडे जमा झालेल्या जादा रकमेचीही वसुली होणार असून ही रक्कम समायोजन करण्याची कार्यवाही सुरू केल्याचे उपायुक्त राेकडे यांनी पत्राद्वारे नागरिक जागृती मंचला कळवले आहे.