वाळव्यात आरक्षण सोडतीत सभागृह गारद

By admin | Published: October 6, 2016 12:53 AM2016-10-06T00:53:10+5:302016-10-06T01:10:00+5:30

पंचायत समिती : आता येणार नवे चेहरे, सर्वसाधारण पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी सात गण, राष्ट्रवादीला धक्का

Auditorium Guards | वाळव्यात आरक्षण सोडतीत सभागृह गारद

वाळव्यात आरक्षण सोडतीत सभागृह गारद

Next

इस्लामपूर : वाळवा पंचायत समिती कार्यक्षेत्रातील २२ गणांच्या आरक्षण सोडतीमधून अख्ख्या सभागृहाची वाट लागली. येडेनिपाणीचे नंदकुमार पाटील वगळता इतर सर्व १९ सदस्यांना पुन्हा गावपातळीवरच काम करा, असा संदेश या सोडतीमधून दिला गेला. त्यामुळे अनुभवी सदस्यांची परंपरा असणाऱ्या या सभागृहात आता पुन्हा सर्व चेहरे नव्याने प्रवेश करणारे असतील. या सोडतीमधून मातब्बर राष्ट्रवादीसह महाडिकांच्या पॉवर बेल्टमध्येही हादरे बसले.
प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विविध पक्ष-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या २२ गणांची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. तहसीलदार श्रीमती सविता लष्करे, नायब तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी सोडतीचे संचालन केले.
बावची या नव्या जि. प. मतदार संघाची भर पडल्याने पंचायत समितीच्या दोन गणांची वाढ झाली. नव्याने तयार करण्यात आलेल्या २२ गणांच्या आरक्षण सोडतीमधून सर्वसाधारण पुरुषांसाठी ७ गण, सर्वसाधारण स्त्रियांसाठी ७ गण, तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुषासाठी आणि स्त्रियांसाठी प्रत्येकी ३, तर अनुसूचित जाती—जमाती प्रवर्गाच्या स्त्री—पुरुषांसाठी प्रत्येकी १ गण आरक्षित झाला. २0१२ च्या आरक्षण सोडतीमध्ये जेथे सर्वसाधारण गटाची आरक्षणे होती, असे ७ गण सर्वसाधारण स्त्रियांसाठी थेट पध्दतीने आरक्षित करण्यात आले.
बुधवारी निघालेल्या आरक्षण सोडतीमधून विद्यमान सभापती रवींद्र बर्डे (वाटेगाव), उपसभापती सौ. भाग्यश्री शिंदे (कारंदवाडी), सदस्य सुनील पोळ (कि.म.गड), जयश्री कदम (रेठरेहरणाक्ष), अजित भांबुरे (ताकारी), प्राजक्ता देशमुख (बोरगाव), सुभाष पाटील (नेर्ले), जयकर नांगरे—पाटील (साखराळे), राजेश्वरी पाटील (कासेगाव), प्रकाश पाटील (पेठ), प्रीती सूर्यगंध (रेठरेधरण), तपश्चर्या पाटील (वाळवा), लालासाहेब अनुसे (बावची), नंदकुमार पाटील (कामेरी), रेखा कोळेकर (गोटखिंडी), अश्विनी गायकवाड (कुरळप), अरविंद बुद्रुक (चिकुर्डे), राजश्री माळी (येलूर), शोभा देसावळे (बहाद्दूरवाडी) व पप्पू शेळके (बागणी) हे सर्व विद्यमान सदस्य गारद झाले.
यातील नंदकुमार पाटील यांच्या पूर्वीच्या कामेरी गणातील गावे सर्वसाधारण पुरुषांसाठी आरक्षित असणाऱ्या गोटखिंडी गणाला जोडली गेल्याने, ते पुन्हा उमेदवारीचा दावा करू शकतात. त्यांना उमेदवारी मिळून ते विजयी झाल्यास, नव्या सभागृहात दुसऱ्यावेळी प्रवेश करणारे ते एकमेव सदस्य ठरतील. वाळव्याच्या सौ. तपश्चर्या नेताजी पाटील यांच्याकडे वाळवा गटातील राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाऊ शकते. हा जि. प. गट सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित झाला आहे. तीच परिस्थिती वाटेगाव आणि कासेगाव गटाची झाली आहे. येथेही दोन्ही जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, पं. स. सभापती रवींद्र बर्डे यांची अडचण झाली. कासेगाव पं. स. गण खुला असल्याने, इच्छा असेल तर देवराज पाटील येऊ शकतात. वाळवा गणातून सरपंच गौरव नायकवडी शड्डू ठोकतील, अशी चर्चा आहे. वाळवा जि. प. व पं. स.चे रणांगण पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. तशीच परिस्थिती महामार्गाच्या पश्चिमेकडील महाडिकांच्या पॉवर बेल्टमध्ये झाली आहे. पेठ, येलूर हे हक्काचे जि. प. मतदारसंघ आरक्षित झाले आहेत, तर फक्त येलूर पं. स. गण खुला झाल्याने याठिकाणी महाडिक परिवारातून कोण येणार, याची उत्सुकता आहे.
बोरगाव जि. प. मतदारसंघ पुन्हा खुला झाल्याने माजी सदस्य जितेंद्र पाटील पुन्हा एकदा काँग्रेसच्या चिन्हावर लढून विजयाची हॅट्ट्रिक करतात का, याची चर्चा रंगू लागली आहे. (वार्ताहर)

Web Title: Auditorium Guards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.