औरंगाबाद नामांतरप्रश्नी राजकारण नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:19 AM2021-01-10T04:19:08+5:302021-01-10T04:19:08+5:30
सांगली : औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याची इच्छा बाळासाहेब ठाकरे यांचीच होती. त्यामुळे त्यांच्या विचाराशी, भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहोत. ...
सांगली : औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याची इच्छा बाळासाहेब ठाकरे यांचीच होती. त्यामुळे त्यांच्या विचाराशी, भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहोत. यावरून कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, असे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. तेथील लोकांचीही तीच मागणी आहे. त्यामुळे आम्ही त्या मागणीला पाठिंबा देत आहोत. शासन म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीत यावरून मतभेद असल्याचे चित्र चुकीचे आहे. यात कोणीही राजकारण आणू नये. त्यामुळे योग्य वेळी याचा निर्णय होईल. आमची भूमिका आम्ही ठामपणे मांंडली आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष असल्याने आमची कोंडी झाल्याची चर्चा चुकीची आहे.
चौकट
एकही नगरसेवक नाही, तरीही निधी दिला
सांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रात आमचा एकही नगरसेवक नाही, तरीही आम्ही महापालिकेला निधी दिला. त्यामुळे आम्ही विकासकामे करताना राजकारण आणत नाही, ही गोष्ट स्पष्ट होते, असे शिंदे म्हणाले.
चाैकट
घटना दुर्दैवी, चाैकशी होणार
भंडारा जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असून, शासन या घटनेची चौकशी योग्य पद्धतीने करेल, असे मत एकनाथ शिंदे व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.