‘इडी’च्या रुपात आजही औरंगजेब जिवंत, अमोल मिटकरींची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 02:13 PM2023-05-29T14:13:15+5:302023-05-29T14:13:50+5:30
'आमच्या बहुजन समाजाला पोथी-पुराणांची नाही तर तुकारामांच्या गाथांची गरज'
बागणी (सांगली) : औरंगजेब मेला असला तरी तो आजही इडीच्या रूपाने जिवंत असल्याचे दिसून येत आहे. आमच्या बहुजन समाजाला पोथी-पुराणांची नाही तर तुकारामांच्या गाथांची गरज आहे. आमच्या थोर समाजसुधारकांनी समाजात जागृती करण्यासाठी आपले जीवन वेचले. त्यांचे काम आता राष्ट्रवादी पक्ष करत आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आज संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी केले.
बागणी (ता. वाळवा) येथे शनिवारी ग्रामपंचायत इमारतीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या तैलचित्राच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती. अमाेल मिटकरी व जयंत पाटील यांच्याहस्ते तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.
मिटकरी म्हणाले, काही लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा संकुचित करून त्यांची बदनामी केली. अठरापगड जातींना घेऊन स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. त्यांचाच वारसा पुढे चालवत संभाजी महाराजांनी स्वराज्य वाढविले पण काही लोकांनी त्यांना बदनाम केले. आताही राजकारण करून युवकांची माथी भडकवण्याचा उद्योग सुरू आहे. मी देखील धार्मिक आहे पण धर्मांध नाही. कोणत्याही जाती-धर्माचा तिरस्कार करत नाही.
जयंत पाटील म्हणाले, आमच्या रक्ताचा गुणधर्म आहे की आम्ही कोणाला घाबरत नाही. कधी कोणापुढे झुकत नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या जनतेला माझ्या विरोधात कोणी बोलले तरी सहन होत नाही. या जनतेने मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. बागणीस ऐतिहासिक वारसा आहे. गावातील युवकांचा स्वाभिमान जागृत रहावा, यासाठी संभाजी महाराजांचे तैलचित्र प्रेरणा देत राहील.
यावेळी सरपंच तृप्ती हवलदार, उपसरपंच संतोष घनवट, सुभाष हवलदार, राजेंद्र पवार, वैभव शिंदे, बाळासाहेब पाटील, सुश्मिता जाधव, रोहिणी जाधव, शैलजा पाटील, प्राजक्ता चंद, भगवानराव पाटील, अल्लाउद्दीन चौगले, संजय पवार, शिगावचे माजी सरपंच उदयसिंह पाटील, प्रदीपकुमार पाटील, ग्रामविकास अधिकारी कुमार भिंगारदेवे उपस्थित होते.