केंद्रीय पथकाकडून अधिकारी धारेवर
By admin | Published: May 17, 2017 11:18 PM2017-05-17T23:18:52+5:302017-05-17T23:18:52+5:30
केंद्रीय पथकाकडून अधिकारी धारेवर
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या रुग्णालयातील भ्रूणहत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी केंद्रीय वैद्यकीय समितीच्या पथकाने बुधवारी डॉ. खिद्रापुरे याच्या रुग्णालयाची तपासणी केली. भ्रूण पुरलेल्या जागेची आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचीही या पथकाने पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अस्वच्छतेबाबत या पथकाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.
केंद्रीय वैद्यकीय समितीच्या पथकात डॉ. सुषमा दुरेगा, डॉ. वीणा धवन, डॉ. जिग्नेश ठक्कर, डॉ. वर्षा देशपांडे यांचा समावेश होता. खिद्रापुरेच्या रुग्णालयाची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांनी पथकास दिली. यावेळी गावातील नाना कांबळे, दीपक घोरपडे, अनिल हुल्ले, फरदीन मुल्ला यांनी आरोग्य विभागाबाबत तक्रारी मांडल्या.
या प्रकरणात खिद्रापुरेला मदत करणाऱ्या कोणाचीही गय करू नये. गावात चालणाऱ्या बेकायदा भ्रूणहत्येची माहिती आम्ही लेखी स्वरूपात आरोग्य विभागाला कळवली होती; पण त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांना याची माहिती कशी मिळत नाही? हे वैद्यकीय अधिकारी येथील आरोग्य केंद्रात रात्रीच्यावेळी उपस्थित नसतात, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या आणखी काही डॉक्टरांची नावेही ग्रामस्थांनी पथकाला दिली. मात्र पथकाने डॉक्टरांची नावे सांगण्यास नकार दिला. त्यानंतर पथकाने म्हैसाळमधील आरोग्य केंद्राला भेट देऊन शस्त्रक्रिया विभाग, बाह्यरुग्ण व औषध विभागांची पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याही प्रकारची स्वच्छता नसल्यामुळे या पथकाच्या निदर्शनास आले. याबाबत डॉ. वर्षा देशपांडे व केंद्रीय पथकाने वैद्यकीय अधिकारी डॉ. टी. के. मोमीन, एन. व्ही. खंदारे यांना धारेवर धरले. गलथान कारभाराबाबत दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांनी खडसावले.
नोटिसा देणार
वैद्यकीय अधिकारी डॉ. टी. के. मोमीन व एन. व्ही. खंदारे यांनी आरोग्य केंद्रातच वास्तव्यास रहावे, यासाठी कारवाईच्या नोटिसा देणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी नसतात, याबाबत ग्रामसभेत निषेधाचा आणि कारवाईचा ठराव होतो आणि हा विषय आरोग्य विभागाला समजत कसा नाही, असा सवाल डॉ. देशपांडे यांनी केला.
दोन रुग्णालयांचीही चौकशी
या पथकाने म्हैसाळ येथील डॉ. टी. ए. चौगुले तसेच नरवाड रस्त्यावरील डॉ. यशवंत सावंत यांच्या रत्ना रुग्णालयाचीही प्राथमिक चौकशी केली. मात्र त्याबाबतचा तपशील समजू शकला नाही.