रखडलेल्या कामांसाठी सत्ताधारी अलर्ट
By admin | Published: July 21, 2016 11:45 PM2016-07-21T23:45:07+5:302016-07-22T00:03:21+5:30
खासदारांची आज तासगावात बैठक : पुतळ्याच्या कामाला सुरुवात
तासगाव : तासगाव नगरपालिकेत अनेक कामे रखडलेली आहेत. शहराच्या विकासात भर टाकणाऱ्या कामांकडे ठेकेदार आणि प्रशासनाच्या दिरंगाईच्या कारभारामुळे कामे मुदतीत पूर्ण झाली नाहीत. निवडणुका तोंडावर आल्याने जनता या कामांच्याबाबतीत जाब विचारणार, असे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिध्द करण्यात आले होते. त्याची दखल घेत निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी अलर्ट झाल्याचे चित्र आहे. गुरुवारी शिवाजी महाराजांचा पुतळा हलविण्यात आला असून, तातडीने नवीन चबुतऱ्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली, तर शुक्रवारी कामांविषयी खासदार संजयकाका पाटील नगरसेवकांची बैठक घेणार आहेत.
तासगाव नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून मार्चेबांधणी सुरूआहे. मात्र पालिकेत गेल्या साडेचार वर्षांत तासगावकरांना समाधानकारक कारभार झाला नाही. याबाबत जनतेतूनही नाराजी व्यक्त होत आहे. पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्चून झालेली अनेक कामे रखडलेली आहेत, तर काही कामांच्याबाबतीत प्रत्यक्षात घोषणाच झाली आहे. याबाबत येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना अडचण निर्माण होऊ शकते. त्याअनुषंगाने पालिकेत सत्ताधारी नगरेसकांची रखडलेली कामे मार्गी लावण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. तर शहरातील विकासकामांच्या अनुषंगाने शुक्रवारी खासदार संजयकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक होणार आहे.
शुक्रवारी छत्रपती शिवरायांचा पुतळा चबुतऱ्यावरून हलवण्यात आला. लवकरच तो पुरातत्व खात्याकडे जमा करण्यात येणार आहे. शिवरायांचा नवीन पुतळा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत, तर पुतळा चबुतऱ्यासाठी पालिकेकडून २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूवी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याहस्ते चबुतऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. शुक्रवारी पुतळा कामासाठी पालिकेस मुहूर्त लागला असून, तातडीने काम पूर्ण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुुरू करण्यात आले आहेत. (वार्ताहर)
‘लोकमत’च्या बातमीने सत्ताधारी गतिमान
दोन दिवसांपूर्वी पालिकेच्या साडेचार वर्षांच्या कारभाराबाबत ‘लोकमत’मधून बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. ‘तासगावात विकासाचा पिंंगा अन् जनतेला ठेंगा’ या मथळ्याखालील बातमीतून पालिकेतील सर्वच सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांच्याबाबतीत भ्रमनिरास झाल्याची लोकांची भावना असल्याचे, तसेच रखडलेल्या कामांबाबतीत वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. त्याची दखल घेत पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी हालचाली गतिमान केल्या असून, याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी खासदारांनी बैठक घेतल्याची चर्चा आहे.