कर्नाटक सीमेवर औटपोस्ट सुरू
By admin | Published: July 25, 2016 11:01 PM2016-07-25T23:01:01+5:302016-07-25T23:06:56+5:30
मिरज ग्रामीणच्या पथकाचा तळ : अवैध धंद्यांना आळा बसणार
सुशांत घोरपडे -- म्हैसाळ --मिरज-कागवाड या महामार्गावर म्हैसाळजवळ कर्नाटक सीमेवर मिरज ग्रामीण पोलिसांनी तंबू ठोकून चेकपोस्ट सुरू केले आहे. त्यामुळे आता अवैध धंद्यांना आळा बसणार आहे.
पोलिस अधीक्षकांनी म्हैसाळ येथे पोलिस चेकपोस्ट सुरू करून आंतरराज्य वाहतुकीवर लक्ष ठेवण्याचे आदेश मिरज ग्रामीण पोलिसांना दिले होते. त्यांच्या आदेशानुसार सीमारेषेवर पोलिसांनी तंबू ठोकला आहे. या महामार्गावरून दररोज शेकडो वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे चंदन, हुबळी मेड दारू, जनावरांच्या मांसाची आयात, गुटखा यांची तस्करी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कर्नाटकच्या अवैध धंदेवाल्यांनी सीमाभागाचा फायदा घेऊन आपले बस्तान चांगलेच बसविले आहे. त्यामुळे अवैध धंद्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मटका तर अजूनही चालूच आहे. म्हैसाळ, नरवाड, आरग, बेडग, विजयनगर येथील मटका एजंटांना व बुकीमालकांना कोणतीही भीती राहिलेली नसल्याचे दिसून येते. मटका अजूनही चोरी-चोरी-चुपके-चुपके सुरूच आहे. होणारी कारवाई ही फक्त नावापुरतीच केली जाते, असा समज सर्वसामान्य नागरिकांचा झाला आहे. आता जिल्हा अधीक्षकांच्या आदेशानुसार आठ पोलिस कर्मचाऱ्यांची म्हैसाळ औटपोस्ट येथे नेमणूक होणार असल्याने, हे चित्र बदलणार, अशी अपेक्षा या भागातील नागरिक करू लागले आहेत.
पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सध्या चार पोलिस कर्मचारी नियुक्त केले आहेत. म्हैसाळ औटपोस्टसाठी जागा मिळावी म्हणून म्हैसाळ ग्रामपंचायतीकडे आपण अर्ज करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.