सूत उद्योगाला मदतीस टाळाटाळ
By admin | Published: September 30, 2016 11:41 PM2016-09-30T23:41:22+5:302016-10-01T00:19:05+5:30
जयंत पाटील : शासनावर टीका; ‘शेतकरी विणकरी’ची वार्षिक सभा उत्साहात
इस्लामपूर : सुताच्या व्यवसायात विजेचा खर्च मोठा आहे. कापसाचे चढे दर आणि सुताला भाव नाही. त्यातच अवास्तव वीज दर यामुळे राज्यातील वस्त्रोद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या व्यवसायाला मदत करण्यासाठी शासनाकडून टाळाटाळ सुरू आहे, असा आरोप माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केला. याचवेळी त्यांनी, या सर्व आव्हानांवर मात करीत शेतकरी विणकरी सूतगिरणी पूर्ण कार्यक्षमतेने सुरु असल्याचे गौरवोद्गारही काढले.
राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाच्या कार्यस्थळावर शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीची १४ वी वार्षिक सभा झाली, यावेळी ते बोलत होते. सूतगिरणीचे अध्यक्ष बबनराव थोटे अध्यक्षस्थानी होते. संकुलाचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयंत पाटील म्हणाले की, सूत व्यवसाय संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. कापूस व सुताच्या दरातील तफावतीमुळे व्यवसाय किफायतशीर राहिलेला नाही. कृत्रिम धाग्याचा वापर करुन तोटा कमी करण्यासाठी सूत निर्मिती सुरु आहे. या व्यवसायातील अनंत अडचणींमुळे जिल्ह्यातील सूतगिरण्यांची अवस्था ‘तीन दिवस बंद—एक दिवस सुरु’ अशी आहे. कापसाचे दर आटोक्यात आले तरच हा व्यवसाय टिकणार आहे.
दिलीपराव पाटील म्हणाले, जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करीत सूतगिरणी नावारुपाला आली. कर्ज न काढता, मिळणाऱ्या नफ्यातून सूतगिरणीचा विस्तार केला. दोन वर्षांपूर्वी २५ हजार स्पिंडलचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून शासनाची मदत झालेली नाही. कापूस—सूत दरातील वाढती तफावत, विजेचे वाढते दर यामुळे दिवसेंदिवस तोटा वाढतच आहे.
अध्यक्ष बबनराव थोटे यांनी प्रास्ताविक केले. संचालक प्रसाद तगारे यांनी आदरांजली ठराव मांडला. कार्यकारी संचालक हेमंत पांडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. मुख्य लेखापाल एच. बी. मुलाणी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. सौ. कमल पाटील, रोझा किणीकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी आभार मानले.
यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, आष्टा पीपल्स बँकेचे अध्यक्ष दिलीप वग्याणी, ज्येष्ठ संचालक बशीर मोमीन, एम. एम. पाटील, उदय शिंदे, विश्वास धस, सुरेखा वाटेगावकर, जगन्नाथ पाटील, रघुनाथ मदने, शशिकांत पाटील, राजेंद्र दिंडे, प्रशांत थोरात, जय महाराष्ट्र सूतगिरणीचे अध्यक्ष संजय जाधव, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, मारुती पेठकर उपस्थित होते. (वार्ताहर)
अनुदानाची गरज : दिलीप पाटील यांचा इशारा
हा व्यवसाय टिकविण्यासाठी वीज दरातील कपातीसह प्रति स्पिंडल ३ हजार रुपयांचे अनुदान शासनाने द्यावे. शासनाने मदत केली नाही, तर दिवाळीपर्यंत राज्यातील हा व्यवसाय ठप्प होईल, असा इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी दिला.