रोजीरोटीला टाळे, पिझ्झा डिलिव्हरी मात्र चालू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:27 AM2021-05-11T04:27:50+5:302021-05-11T04:27:50+5:30
सांगली : कोरोना संसर्ग वाढतच चालल्याने प्रशासनाने अखेर कडक लॉकडाऊनला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार थांबून कोरोना साखळी ...
सांगली : कोरोना संसर्ग वाढतच चालल्याने प्रशासनाने अखेर कडक लॉकडाऊनला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार थांबून कोरोना साखळी तुटण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे. मात्र, त्याचवेळी फूड डिलिव्हरीस मात्र मुभा देण्यात आल्याने कोरोनाला घरापर्यंत निमंत्रण दिले जात आहे. लॉकडाऊनमध्ये रोजीरोटीला टाळे लावण्यात आले असलेतरी पिझ्झा डिलिव्हरी चालू ठेवल्याने प्रशासनाचे अनियोजन समाेर आले आहे. दरम्यान, फूड डिलिव्हरी करणारे तरुणही जोखीम पत्करूनच काम करत आहेत.
जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर प्रशासनाने काय चालू आणि काय बंद राहणार याबाबत सविस्तर निवेदन दिले होते. यातून घरापर्यंत येऊन अन्न पोहोचविणाऱ्या सेवेस मुभा दिली होती. अत्यावश्यक वेळी या सेवेचा फायदाच होणार असलातरी प्रत्यक्षात फूड डिलिव्हरीच्या नावाखाली काही तरुण भटकत आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासणीत अनेक ‘डिलिव्हरी बॉय’कडे जेवणाऐवजी केवळ पिझ्झासारखे पदार्थच जास्त आढळून आले आहेत.
पोलिसांनी कारवाई सुरू केल्यापासून ही सेवा देणाऱ्या तरुणांचीही चौकशी केली, त्यात बहुतांश तरुणांकडे केवळ पिझ्झा आढळून आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. घरी कोणी नसताना अथवा इतर अडचणीच्या वेळी जेवण घरपोच हाेण्यासाठी ही सुविधा चांगली असलीतरी केवळ अशा पदार्थांमुळे लॉकडाऊनचे गांभीर्य कमी होत आहे. रस्त्यावर सध्या असलेल्या वाहनांपैकी बहुतांश वाहने ही फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणांचीच असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
मुळात कोराेनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी काळजी घेतली जात असताना, या सेवेतील तरुणांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरी करत असल्याने हे तरुणही जोखीम पत्करूनच सेवा देत आहेत. त्यांच्याही आरोग्याची काळजी त्या कंपन्यांनी घेणे आवश्यक बनले आहे.
चौकट
तरुणांची चाचणी कधी?
घरी येऊन जेवण पोहोच करून देणाऱ्या या तरुणांच्याही कोरोना तपासणीबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या तरुणांचा वावर अधिक ठिकाणी असल्याने त्यांची त्या त्या फूड डिलिव्हरी कंपनीमार्फत नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, शनिवारी शहरातील विविध भागात पोलिसांनी तरुणांकडे अहवालाची चौकशी केलीतर अशी चाचणी केली नसल्याचे आढळले.