लोकसभेला जागरण; विधानसभेला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 02:09 PM2019-07-30T14:09:57+5:302019-07-30T14:10:53+5:30

तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या गावांत भाजप आणि राष्ट्रवादीचे स्वतंत्र गट आहेत. या गटांनी लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाडी धर्माचे जागरण करत चोख पक्षनिष्ठा बजावली. मात्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी युती, आघाडी बासनात गुंडाळण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे २१ गावांतील दोन्ही गटांकडून सोयीनुसार, निष्ठेच्या गोंधळाचा संबळ वाजणार असल्याचे दिसून येत आहे.

Awakening of Lok Sabha; Confusion to the Assembly | लोकसभेला जागरण; विधानसभेला गोंधळ

लोकसभेला जागरण; विधानसभेला गोंधळ

Next
ठळक मुद्देलोकसभेला जागरण; विधानसभेला गोंधळनिष्ठेच्या गोंधळाचा संबळ वाजणार

दत्ता पाटील 

तासगाव : तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या गावांत भाजप आणि राष्ट्रवादीचे स्वतंत्र गट आहेत. या गटांनी लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाडी धर्माचे जागरण करत चोख पक्षनिष्ठा बजावली. मात्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी युती, आघाडी बासनात गुंडाळण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे २१ गावांतील दोन्ही गटांकडून सोयीनुसार, निष्ठेच्या गोंधळाचा संबळ वाजणार असल्याचे दिसून येत आहे.

युती, आघाडी, पक्षनिष्ठा, नेत्यांवरची निष्ठा, या शब्दांची जागा आयाराम आणि गयारामांनी घेतली. मात्र या सर्वांनाच छेद देत विसापूर सर्कलमध्ये एक नवीन पॅटर्न सुरू झाला आहे. राजकारणाच्या प्रचलित परंपरांना छेद देणाऱ्या या पॅटर्नची चर्चा सध्या तासगावसह खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात सुरू आहे.

मांजर्डे आणि विसापूर जिल्हा परिषद गटातील २१ गावांचा खानापूर -आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या गावांत खा. संजयकाका पाटील यांना मानणारा भाजपचा गट, तर आ. सुमनताई पाटील यांना मानणारा राष्ट्रवादीचा गट असे दोन गट आहेत. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही गटांनी युती, आघाडी धर्माचे पालन करून स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

या मतदारसंघाचे आ. अनिल बाबर यांनीही युती धर्माचे पालन करून खा. संजयकाका पाटील यांच्या पाठीशी ताकद उभा केली. त्यावेळी आमदार बाबरांचा पैरा फेडण्याची ग्वाही खासदार संजयकाका पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनीही दिली.

लोकसभा निवडणुकीनंतरही काही काळ युती, आघाडीचे गोडवे सुरू राहिले; मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा समीकरणे बदलली. लोकसभा निवडणुकीच्या काळात आ. बाबर यांनी भाजपच्या खा. संजयकाकांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. यावेळी भाजपचे शिलेदार व्यासपीठावर होते.

दोन दिवसांपूर्वी मांजर्डेत विकासकामांचे औचित्य साधून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील यांनी २१ गावांतील राष्ट्रवादीची मोट बांधली. या व्यासपीठावर आ. बाबर यांनी हजेरी लावली. विकासकामांचे निमित्त असले तरी, २१ गावांतील राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी विधानसभेला आ. बाबर यांना रसद देण्याचे संकेत दिले आहेत.

राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आ. बाबर येणार असल्याचे स्पष्ट होताच, मांजर्डेतील भाजपचे पदाधिकारी सचिन पाटील यांनी स्नेहभोजनाचे औचित्य साधून माजी आ. सदाशिवराव पाटील यांना बोलवत वरकडी केली. विसापूर सर्कलमधील २१ गावांतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची लोकसभेनंतर पुन्हा सदाशिवराव पाटील यांच्याशी जवळीक साधली आहे. त्यामुळे लोकसभेला निष्ठेचे जागरण करणाऱ्या २१ गावांतील कारभाऱ्याकडून विधानसभा निवडणुकीत नवा राजकीय गोंधळ घडविण्यासाठी संबळ वाजवण्यास सुरुवात झाल्याचे आता संकेत मिळत आहेत.

Web Title: Awakening of Lok Sabha; Confusion to the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.