खानापूर तालुक्यात कायदा, योजनांची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:30 AM2021-09-24T04:30:52+5:302021-09-24T04:30:52+5:30
फोटो ओळ - विटा न्यायालयात कायदा व विविध योजनांच्या प्रशासकीय स्तरावरील जनजागृतीसाठी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या. एस. एन. ...
फोटो ओळ - विटा न्यायालयात कायदा व विविध योजनांच्या प्रशासकीय स्तरावरील जनजागृतीसाठी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या. एस. एन. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि. २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत खानापूर तालुक्यात कायदा व शासनाच्या विविध योजनांची प्रशासकीय स्तरावरून प्रभावीपणे जनजागृती करण्याचा निर्णय विटा न्यायालयात झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या. एस. एन. शिंदे अध्यक्षस्थानी होते.
सर्वाेच्च न्यायालयाव्दारे ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हा कार्यक्रम तालुक्यातील प्रत्येक खेडोपाडी व वाडी-वस्तीवर अगदी दुर्गम भागातही घेण्यात येणार असल्याचे यावेळी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. एन. शिंदे यांनी सांगितले.
सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या. ए. एन. कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्या. श्रीमती डी. एस. चोथे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्या. जी. एस. हांगे, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्या. डी. एम. हिंग्लजकर उपस्थित होते.
या बैठकीत न्यायदानाची प्रक्रिया सुलभ करण्याच्यादृष्टीने व नागरिकांच्या वेळ आणि पैशाची बचत होऊन त्यांच्या कुटुंबाचा विकास व्हावा, याची माहिती देण्यात आली. तसेच सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह विविध शाळा, महाविद्यालयांनीही या जनजागृती कार्यक्रमास सहभागी होण्याचे आवाहन यावेळी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या. एस. एन. शिंदे यांनी केले.
या बैठकीस प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, सहायक गटविकास अधिकारी पंकज शेळके, मुख्याधिकारी अतुल पाटील, श्रीमती अश्विनी पाटील, पोलीस निरीक्षक संतोष डोके, सुरेश् यादव, विटा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. एस. जी. घोरपडे, उपाध्यक्षा ॲड. शौर्या पवार आदी उपस्थित होते.