सांगोले येथे ग्रामपंचायत सदस्यांवर कुऱ्हाडीने हल्ला, दोघे सदस्य जखमी, गावात तणाव
By संतोष भिसे | Published: December 10, 2023 06:49 PM2023-12-10T18:49:13+5:302023-12-10T18:49:29+5:30
विटा पोलिसांनी संशयित रमेश शंकर कोळेकर (रा. सांगोले) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती.
विटा : रस्त्यावरील मातीचा ढीग बाजूला केल्याने संतापलेल्या एकाने ग्रामपंचायत सदस्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. ही घटना सांगोले (ता. खानापूर) येथे रविवारी सकाळी घडली. यामध्ये सिद्धनाथ हणमंत बाबर (वय ३६) हे ग्रामपंचायत सदस्य जखमी झाले. विटा पोलिसांनी संशयित रमेश शंकर कोळेकर (रा. सांगोले) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती.
सांगोले येथे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ प्रत्येक रविवारी स्वच्छता अभियान राबवितात. आज सकाळी सिद्धनाथ बाबर, उपसरपंच विजयकुमार बाबर, अण्णासाहेब बाबर, धारेश्वर गुजर, महादेव बाबर, सोमनाथ वाळेकर, प्रताप कोळेकर, अशोक बाबर, वसंत बागल, संजय निकम यांच्यासह सुमारे ४० ते ५० ग्रामस्थ स्वच्छता करीत होते. वाळूज रस्त्याच्या बाजूपट्टीवर रमेश कोळेकर यांनी माती टाकली होती. घरासमोरील गटार उकरून कचरा टाकला होता. यामुळे बसस्थानकाकडे जाणाऱ्या प्रवासांची, तसेच बसला अडथळा होत होता. त्यामुळे सदस्यांनी मातीचा ढीग बाजूला काढण्याचा प्रयत्न कडे. त्यावेळी कोळेकर तेथे आले. मातीचा ढीग माझ्या जागेत असल्याने काढू नका, असे सुनावले.
सदस्यांनी ढिगाऱ्यामुळे लोकांना अडचण होत असल्याने काढणार असल्याचे सांगितले. त्यावेळी संतप्त कोळेकर यांनी घरातून कुऱ्हाड आणली, सदस्य बाबर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे २०० ते ३०० ग्रामस्थांनी विटा पोलिस ठाण्यात गर्दी केली. संशयितावर कडक कारवाईचा आग्रह धरला.
हातावर, मानेवर कुऱ्हाडीचे वार
कोळेकर याचा कुऱ्हाडीचा हल्ला अण्णासाहेब बाबर यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही वार झाला. त्यात त्यांच्या उजव्या हाताच्या बोटास दुखापत झाली. या हल्ल्यात सिद्धनाथ बाबर यांच्या मानेला जखम झाली आहे.