भ. बाहुबलींच्या संदेशातून सौहार्दपूर्ण विश्वाची निर्मिती : व्यंकय्या नायडू - महामस्तकाभिषेक महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:45 PM2018-02-10T23:45:07+5:302018-02-10T23:47:03+5:30
बाहुबली/सांगली : जगातील सर्वांत प्राचीन जैन धर्माने अहिंसा, प्रेम, शांतीचा संदेश दिला आहे. भगवान बाहुबलींसह २४ तीर्थंकरांनी दाखविलेल्या अहिंसा, त्यागाच्या मार्गावरूनच शांती, सौहार्दपूर्ण विश्वाची
राज्याभिषेक सोहळ्याचे उद्घाटन;
बाहुबली/सांगली : जगातील सर्वांत प्राचीन जैन धर्माने अहिंसा, प्रेम, शांतीचा संदेश दिला आहे. भगवान बाहुबलींसह २४ तीर्थंकरांनी दाखविलेल्या अहिंसा, त्यागाच्या मार्गावरूनच शांती, सौहार्दपूर्ण विश्वाची निर्मिती होण्यास प्रेरणा मिळेल, असा आशावाद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी व्यक्त केला.
श्रवणबेळगोळ येथे सुरू असलेल्या गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवात शनिवारी तपकल्याणकचे विधी झाले. त्याअंतर्गत राज्याभिषेक सोहळ्याचे उद््घाटन उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. नायडू यांच्या हस्ते भगवान आदिनाथ यांच्या मूर्तीवर रत्नकिरीट चढवून मोत्यांनी अभिषेक घालण्यात आला. यावेळी राज्यपाल वजूभाई वाला, केंद्रीय संसदीय व्यवहारमंत्री अनंतकुमार, कर्नाटकचे मंत्री ए. मंजू, भट्टारक पट्टाचार्य चारुकीर्ती स्वामीजी, महोत्सव समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सरिता जैन, सचिव सुरेश पाटील, आचार्य श्री १०८ वर्धमानसागर महाराज, त्यागीगण, आदी प्रमुख उपस्थित होते.
मंत्री ए. मंजू यांनी स्वागत केले. यावेळी आचार्य वर्धमानसागर महाराज, आचार्य पुष्पदंत सागर महाराज यांचे प्रवचन झाले. कर्नाटकचे वस्त्रोद्योगमंत्री रुद्राप्पा लमानी, एम. ए. गोपालस्वामी, महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष जितेंद्रकुमार, सचिव सतीश जैन उपस्थित होते.
दरम्यान, शनिवारी सकाळी तपकल्याणकचे विधी, बालक्रीडा उत्सव, मौजीबंधन कार्यक्रम झाला. दुपारी राजा ऋषभदेवाचे (आदिनाथ)े भव्य मिरवणुकीने आगमन झाले. यावेळी सुंदर असा राजदरबाराचा देखावा उभारला. या दरबारात त्यांची प्रतीकात्मक राजसभा झाल्यावर राज्याभिषेक सोहळा पार
पडला.
१0८ ग्रंथांचे प्रकाशन
उपराष्ट्रपतींच्या हस्ते भारतीय जैन पीठाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून १0८ ग्रंथाचे प्रकाशन केले. यावेळी नायडू यांनी काही ग्रंथ नजरेखालून घातले आणि चारुकीर्ती स्वामीजी यांच्याशी चर्चा केली.
बिहारमध्ये प्राकृत विद्यापीठ : अनंतकुमार
श्रवणबेळगोळ येथे प्राकृत विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. त्याच धर्तीवर भगवान महावीर यांचे जन्मस्थळ असलेल्या बिहारमधील वैशाली येथे प्राकृत विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी दिली. ही दोन्ही विद्यापीठे जैन तत्त्वज्ञानाचा प्रसार व प्रचारात दीपस्तंभासारखे काम करतील, असेही ते म्हणाले.