बाबासाहेब पुरंदरे हेच जेम्स लेनचे गुरू, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 05:07 PM2022-04-18T17:07:19+5:302022-04-18T17:08:04+5:30
लेनच्या पुस्तकाचा विषय तूर्त थांबविला पाहिजे. यामुळे शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची बदनामी होत आहे.
सांगली : राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा राबविण्यापूर्वी आजोबांच्या वारशाचा अभ्यास करावा. त्यांची भूमिका हिंदू-मुस्लीम दंगे भडकविणारी आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला. बाबासाहेब पुरंदरे हेच जेम्स लेन यांचे गुरू होते, असा दावाही त्यांनी केली.
सांगलीत रविवारी (दि. १७) पत्रकार बैठकीत गायकवाड बोलत होते. ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या भूमिकेचा फायदा भाजपलाच होईल. मनसेला स्वत:ची जागा निर्माण करण्यासाठी भाजपशी हातमिळवणी करावी लागत आहे. हनुमान चालिसा, ५ जानेवारीला अयोध्येला जाण्याचे नियोजन किंवा बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेणे ही राजकारणाची चिन्हे आहेत. यातून हिंदू-मुस्लीम दंगे भडकावण्याचाही प्रयत्न आहे.
गायकवाड म्हणाले की, राज ठाकरे यांनी जेम्स लेनचा विषय १७-१८ वर्षांनी काढण्याचे कारण नाही. त्यांनी आजवर कधीही लेनचा निषेध नोंदविलेला नाही. लेन यांनी बाबासाहेब पुरंदरेशी माझा कोणत्याही प्रकारे संबंध नाही असे मेलवरून मला तीनवेळा कळविले आहे. पण पुण्यात अनेक वर्षे राहूनही पुरंदरेंशी संबंध नाकारणे म्हणजे खोटेपणा आहे. लेनच्या पुस्तकाचा विषय तूर्त थांबविला पाहिजे. यामुळे शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची बदनामी होत आहे.
ते म्हणाले, पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण अपेक्षित नव्हता, पण संघशिक्षक म्हणून दिला गेला. आता पुरस्कार परत घेण्याची मागणी होत असली, तरी त्याविषयी गांभीर्याने विचार व्हायला हवा. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांना घरोघरी पोहोचविले या राज ठाकरेंच्या दाव्याला काही अर्थ नाही, त्यापूर्वीच महाराज प्रत्येकाच्या घरात पोहोचले आहेत.
यावेळी ए. डी. पाटील, काका हलवाई, जयवंत सावंत आदी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले ...
- मनसे पुन्हा उभा राहणे कठीण
- भोंग्याचा अजेंडा राजकारणासाठी, राज ठाकरेंची दिशा सतत बदलणारी
- शरद पवार यांच्या घरावरील हल्ला म्हणजे राजकारणाचा अतिरेक
- जेम्स लेनच्या पुस्तकाचा विषय आता थांबवायला हवा
चळवळीच्या वाटेवर आयुष्याची वाताहात
गायकवाड म्हणाले की, तरुण वयात झपाटलेपणाने मुले चळवळीत काम करतात, संघर्ष करतात. चाळिशी आल्यावर व्यवहाराच्या झळा बसू लागतात, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आयुष्याची वाताहात होते. हे लक्षात घेऊन संभाजी ब्रिगेडने कार्यकर्त्यांच्या अर्थकारणाला प्राधान्य दिले आहे. नुकतीच आम्ही व्यवसाय परिषद घेतली. महाराष्ट्रभरातील प्रत्येक कार्यक्रमात व्यवसायासाठी आवाहन करतो.