बाबूराव कचरे यांचा ‘कुडची, शिरगाव’ वांग्याचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:24 AM2021-03-28T04:24:33+5:302021-03-28T04:24:33+5:30
फोटो-०३बाबूराव कचरे योगेश नरुटे सांगली : सांगलीच्या कृषी जगतामध्ये संशोधक शेतकऱ्यांची कमी नाही. यात भर घातली ती कारंदवाडी (ता. ...
फोटो-०३बाबूराव कचरे
योगेश नरुटे
सांगली : सांगलीच्या कृषी जगतामध्ये संशोधक शेतकऱ्यांची कमी नाही. यात भर घातली ती कारंदवाडी (ता. वाळवा) येथील बाबूराव राऊ कचरे यांनी. त्यांनी देशी ‘कुडची बिगर काटा व शिरगाव काटा वांग्यांची’ जात विकसित करून या जातींची वेगळी ओळख करून दिली. त्यांच्या या कामगिरीबद्दल राज्य शासनाने २००२ मध्ये त्यांचा ‘कृषिभूषण’ पुरस्काराने गाैरव केला. बाबूराव कचरे हे सध्या हयात नसले, तरी त्याचे कुटुंबीय या वाणांचा प्रसार करत आहेत. कचरे यांनी १९७६ पासून महाबीज कंपनीसाठी पालेभाज्यांच्या बीज उत्पादनाचे काम केले. या माध्यमातून त्यांनी कारंदवाडी येथे १९९० च्या सुमारास नर्सरीची उभारणी केली. अनेक वर्षांच्या अनुभवाच्या जाेरावर त्यांनी १९९० ते १९९५ या कालखंडात देशी वांग्याचा वाण विकसित केला. गोल आकार, चकचकीत हिरवा रंग, चवीला उत्कृष्ट आणि बिगरकाटा अशी या वांग्याची वैशिष्ट्ये आहेत. या वांग्याला पहिल्यांदा कर्नाटक राज्यातील कुडची परिसरातील शेतकरी व ग्राहकांकडून मोठी मागणी आली. यामुळे सांगलीच्या मातीत विकसित झालेल्या या वाणाला ‘कुडची’ अशी ओळख मिळाली. एकरी १५ ते २० टन उत्पादन देणाऱ्या या वांग्याला इतर वांग्यापेक्षा १० रुपये जादा दर मिळतो. एका एकरात, एक लाखाच्या खर्चात वार्षिक चार ते आठ लाखांपर्यंत आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांनी घेतले आहे. या वाणास सांगली जिल्ह्यासह सोलापूर व कर्नाटकच्या सीमाभागात मोठी मागणी आहे.
यानंतर बाबूराव कचरे यांनी १९९० च्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील तमदलगे (ता. हातकणंगले) या ठिकाणी दुसरी रोपवाटिका उभारली. या ठिकाणी त्यांनी दुसरे देशी वाण विकसित केले. लांब देठ, अंडाकृती आकार, उत्कृष्ट चव आणि काटा असणारी ही वांग्याची जात आहे. या परिसरातील शिरगाव येथील शेतकरी व ग्राहकांनी याची मोठी मागणी केल्याने या वांग्याला ‘शिरगाव’ असे नाव पडले.