खराब टायरींनी वाढविले शहराचे सौंदर्य, सांगली स्वच्छ करायचा युवकांनी घेतला वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 02:48 PM2019-03-13T14:48:40+5:302019-03-13T14:51:22+5:30
गेल्या तिनशे दिवसांपासून स्वच्छता अभियान राबवीत विविध उपक्रमांनी शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम निर्धार संघटनेने सुरु केले आहे. आता खराब टायरीतून शहर सुशोभीकरणाची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.
सांगली : गेल्या तिनशे दिवसांपासून स्वच्छता अभियान राबवीत विविध उपक्रमांनी शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम निर्धार संघटनेने सुरु केले आहे. आता खराब टायरीतून शहर सुशोभीकरणाची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.
सांगलीत स्वच्छतेसाठी खूळ लागलेल्या काही तरुण पोरांनी एकत्र येऊन सांगलीनगरी स्वच्छ करायचा वसा घेतला आहे. राकेश दड्डण्णावर याने यात पुढाकार घेतला आहे. आज त्याच्याच धडपडीने सांगलीचे काही कोपरे, काही भाग माणसात आले आहेत. या युवकांनी एकत्र येऊन निर्धार संघटना या ग्रुपच्या माध्यमातून १ मे २०१८ महाराष्ट्र दिनापासून स्वच्छ सांगली, सुंदर सांगली, कचरामुक्त सांगली या संकल्पनेचा निर्धार केला. स्वच्छता यात्रा सांगली हे अभियान प्रभागानुसार सुरू केले.
नागरिकांना आवाहन केलं, पण त्यांची वाट बघण्यात वेळ घालवला नाही. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता राकेश दड्डणावर आणि त्यांचे सहकारी सांगली शहरात दररोज एका ठिकाणी एखादा परिसर साफसफाई करताना दिसतात. त्यांचं हे स्वच्छता अभियान आता स्वच्छतेतून सुंदरतेकडे निघाले आहे.
राकेशचा ग्रुप आता सांगलीत स्वच्छ केलेले पॉईंट सुशोभित करण्याची मोहीम राबवतो आहे. त्यासाठी त्यांना हवे आहेत खराब झालेले टायर, झाडाचे बुंधे, रंग, ट्री गार्ड..आजपर्यंत त्यांच्याकडे ४० टायर जमा झालेत. ते रंगवायचं कामही जोरात सुरु आहे. या टायरमध्ये झाडी लावण्यात येणार आहेत. नारळाच्या झाडाचे बुंधेही रंगवायचे सुरु आहे. बऱ्याच प्लास्टिक बाटल्या पण सुशोभीकरणाच्या कमी येत आहेत. आम्हाला कचरा, भंगार द्या..आम्ही तोही सुंदर करू असं राकेश सांगत आहे