हजारो भाविकांच्या उपस्थितीत बगाड यात्रा :बावधनला बगाड पाहण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:23 PM2019-03-25T23:23:05+5:302019-03-25T23:23:28+5:30
‘काशिनाथाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात वाई तालुक्यातील बावधन येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडली.
बावधन : ‘काशिनाथाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात वाई तालुक्यातील बावधन येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी हजारो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद घेतला.
बावधन गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णातीरावरील सोनेश्वर येथून सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बगाड मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यापूर्वी बगाड्या परमेश्वर माने यांना नदीत स्नान घालून देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली. त्यानंतर बगाड्यास पारंपरिक पोशाख घालून बगाड्याला झोपाळ्यावर बसविण्यात आले.
यावेळी भाविकांनी नोटा व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडाच्या शिडाला बांधले. बगाड म्हणजे दोन मोठी चाके असलेला रथ. या रथावर सुमारे तीस-चाळीस फूट उंचीच्या शिडावर झोपाळ्याच्या साह्याने बगाड्यास चढविण्यात येते. यावर्षी हा मान परमेश्वर ऊर्फ दिलीप माने (वय ५२) यांना मिळाला. एका वेळी दहा-बारा बैल जोड्यांच्या मदतीने हा रथ ओढण्यात येत होता. ठराविक अंतरावर बैल बदलण्यात येत होते. त्यासाठी पंधराशे बैल शिवारातून उभे दिसत होते.
बगाड रथाच्या मागे वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाची पालखी सुशोभीत करून ठेवण्यात आली होती. त्याचे भाविक दर्शन घेत होते. काही ठिकाणी बगाड थांबवून विश्रांती घेण्यात येत होती. यावेळी पाच फेऱ्या घालण्यात येत होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दरवर्षीप्रमाणे नियोजन समिती नेमली होती. या समितीतील सदस्य बगाडाच्या पुढे व मागे ध्वनिक्षेपकावरून मार्गदर्शन व सूचना करीत होते.
भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यक्ती व सामाजिक संस्थांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र्राचे पथक तैनात करण्यात आले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास बगाड, वाई-बावधन रस्त्यावर आले. यावेळी काही काळ वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सात वाजता बगाड गावात मंदिराजवळ पोहोचले. यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला. मिरवणुकीच्या मार्गावर आईस्क्रीम व शीतपेयाच्या हातगाड्या उभ्या होत्या. वाई-सातारा रस्त्यावर दुतर्फा हॉटेल व मिठाई व्यावसायिक, खेळणीवाले, शीतपेयांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांनी दुकाने थाटली होती. भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
यात्रेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर यांच्यासह पन्नास पोलीस कर्मचारी, राखीव पोलीस दलाची तुकडी, महिला व वाहतूक पोलीस, होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले होते. बगाड मिरवणूक शांततेत पार पडली.
सातारा जिल्ह्यातील बावधन येथील ग्रामदैवताची सोमवारी यात्रा होती. यानिमित्ताने बगाडाची मिरवणूक आयोजित केली होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून हजारो भाविक दाखल झाले होते.