Sangli News: बदाम बैलाची एक्झिट येडेमच्छिंद्रकरांना चटका लावून गेली!, घरापासून शेतापर्यंत करायचा एकट्याने प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 05:54 PM2023-03-08T17:54:29+5:302023-03-08T17:55:12+5:30
रीतसर धार्मिक विधी
निवास पवार
शिरटे : माणसालाही अचंबित करणारी शिस्त, कुटुंबातील सदस्यांपेक्षा जास्त कष्ट उपसण्याची वृत्ती अन् माणसांवर जिवापाड प्रेम करण्याचे व्रत घेऊन ३० वर्षे येडेमच्छिंद्रमध्ये वास्तव्य करणाऱ्या ‘बदाम’ बैलाची एक्झिट गावकऱ्यांच्या मनाला चटका लावून गेली.
घरापासून शेतापर्यंत व परत तसाच चार किलोमीटरचा प्रवास तो एकट्याने करायचा. रस्त्याच्या डाव्या बाजूनेच चालण्याची शिस्त त्याने कधीही मोडली नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपलासा वाटणारा ‘बदाम’चा प्रवास तब्बल ३० वर्षांचा. शनिवारी त्याने अखरेचा निरोप घेतला.
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील चिंचेच्या मळ्यात राहणारे सुरेश पाटील यांच्या घरीच लहानाच्या मोठ्या झालेल्या या बैलाने पाटील कुटुंबासह सर्वांनाच लळा लावला होता.
पाटील यांची शेतजमीन कऱ्हाड-तासगाव रस्त्यावरील भवानीनगर गावालगत. पाटील शेतात जाताना बदामला मोकळे सोडायचे आणि ते सायकल किंवा मोटारसायकलवरून पुढे जायचे. चिंचेचा मळा, येडेमच्छिंद्र गाव, कऱ्हाड-तासगाव रस्ता पार करून ‘बदाम’ शेतात पोहोचायचा. तिथले काम झाले की पुन्हा सायंकाळी पाच वाजता त्याचा परतीचा प्रवास ठरलेला.
प्रवासात बदामने कोणालाच त्रास दिला नाही. अनोळखी व्यक्ती बैल सुटलाय म्हणून ओरडत, पण त्याच्याबद्दल कळले की अनोळखी लोकही अवाक् व्हायचे. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे तो अपार कष्टही घेत होता. त्याच्या पायात लक्ष्मी आहे, अशी पाटील कुटुंबीयांची भावना होती. प्रतिकूल परिस्थितीतून पाटील कुटुंबीयांना जे काही चांगले दिवस अनुभवाला आले, त्यात बदामचे योगदान मोठे होते, अशीही त्यांची धारणा होती. त्यामुळे त्याच्या निधनानंतर पाटील कुटुंबीयांसह गावही हळहळले. पाटील कुटुंबीयांनी रीतसर रक्षाविसर्जन करून त्यास श्रद्धांजली अर्पण केली.
रीतसर धार्मिक विधी
पाटील कुटुंबीयांनी बदामला सदस्यच मानले होते. त्यामुळे त्याच्या निधनानंतर सोमवारी माती सावरण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतरचे दशक्रिया व उत्तरकार्यविधी रीतसरच करणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.