म्हमद्याने केले वेशांतर!
By admin | Published: December 7, 2015 11:36 PM2015-12-07T23:36:47+5:302015-12-08T00:36:55+5:30
छायाचित्रे मिळाली : दाढी वाढविली, डोक्यावर टोपी
सांगली : खंडणीच्या गुन्ह्यातील साक्षीदार गोरखनाथ ऊर्फ मनोज माने याचा खून करून रातोरात गायब झालेला गुंड म्हमद्या नदाफ हा वेशांतर करून सांगलीतच फिरत असल्याची पक्की माहिती सोमवारी पुन्हा पोलिसांना मिळाली आहे. त्याने स्वत:चा ‘लूक’ बदललेले ताजे छायाचित्रही मिळाले आहे. या छायाचित्रात म्हमद्याने दाढी वाढविली आहे, तसेच डोक्यावर टोपीही घातल्याचे दिसून येते. आर्थिक वाद व खंडणीचा गुन्हा मागे घेण्यास नकार देणाऱ्या मनोज मानेचा खून होऊन महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला, तरी म्हमद्याचा शोध लागलेला नाही. त्याला सांगलीतच फिरताना अनेकांनी पाहिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ज्यांनी ज्यांनी त्यास पाहिले आहे, त्या सर्वांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांचा जबाबही नोंदविला आहे. दोन दिवसांंपूर्वी वसंतनगर येथील एका पान टपरीतून त्याने मावा घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच यशवंतनगर येथील वसंतदादा कुस्ती केंद्राजवळ त्याला फिरताना अनेकांनी पाहिले आहे. काही लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. पण पोलीस येण्यापूर्वीच तो तेथून पसार झाला होता. सध्या म्हमद्याचा साथीदार वासीम खान व समीर नदाफ हे दोघेच अटकेत आहेत. म्हमद्याचा शोध घेण्यासाठी सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, गुंडाविरोधी पथक व कुपवाड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे. म्हमद्या कुठे जाऊ शकतो, ती सर्व ठिकाणे तपासून झाली आहेत. त्याला मदत करणाऱ्यांच्या नाड्याही आवळल्या. तरीही तो शरण येत नाही. यावरून त्याला अजून मदत मिळत असण्याची शक्यता आहे. अटकेतील समीर नदाफ याच्याकडून म्हमद्याविषयी माहिती काढण्याचे काम सुरु आहे. तसेच त्याच्या पुर्वीच्या साथीदारांची अजूनही पोलिसांकडून धरपकड सुरुच आहे. (प्रतिनिधी)
दोन छायाचित्रे पोलिसांकडून प्रसिद्ध
म्हमद्याने पोलिसांच्या कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी स्वत:चा लूक बदललेली दोन छायाचित्रे मिळाल्याचे पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. एका छायाचित्रात म्हमद्याने मिशा काढल्या आहेत व केसांची रचनाही बदलली आहे. दुसऱ्या छायाचित्रात म्हमद्याने दाढी वाढविली असून डोक्यावर त्याने टोपी घातली आहे. तो सातत्याने लूक बदलत असल्याने त्याला ओळखणे कठीण बनले आहे.