साखरेबरोबरच बगॅस, मोलॅसीसचे दर गडगडले : कारखान्यांसमोर अडथळ्यांची मालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:05 AM2018-02-11T01:05:28+5:302018-02-11T01:07:15+5:30
सांगली : साखरेचे दर सध्या वाढू लागले असले तरीही बगॅस, मोलॅसीस, इथेनॉल, को-जनरेशन या उपपदार्थांचेही दर पंधरा दिवसांत घटले आहेत.
अशोक डोंबाळे ।
सांगली : साखरेचे दर सध्या वाढू लागले असले तरीही बगॅस, मोलॅसीस, इथेनॉल, को-जनरेशन या उपपदार्थांचेही दर पंधरा दिवसांत घटले आहेत. प्रतिटन बगॅसचे २२०० वरुन १६९० रुपये, मोलॅसीसचे ६५०० रुपयांवरुन ३५०० रुपयांपर्यंत दर गडगडले आहेत. साखर उद्योग अडचणीत येण्यास व्यापाºयांचा मनमानी कारभार आणि साठेबाजी कारणीभूत असल्याचा जाणकारांचा आरोप आहे. याकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
राज्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू झाले त्यावेळी प्रतिक्विंटल साखरेला ३६०० रुपये दर होता. नोंव्हेंबर, डिसेंबर २०१७, जानेवारी २०१८ अशा तीन महिन्यांच्या कालावधित साखरेचे दर कमीच होत आहेत. दि. ६ फेब्रुवारीला तो दर प्रति क्विंटल २८०० रुपयांपर्यंत खाली आला होते. केंद्र आणि राज्य शासनाने साखर खरेदीसह आयात शुल्कात वाढ केल्यामुळे साखरेचे दर वाढू लागले आहेत. सध्या प्रति क्विंटल ३२०० रुपयांपर्यंत साखरेचे दर पोहोचले आहेत. दराच्या वाढीचा विचार न करताच कारखानदारांनी एकत्रित येत दोन दिवसांपूर्वी प्रतिटन २५०० रुपये पहिली उचल देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. दर कमी होत असले तरीही एफआरपी अधिक २०० ही रक्कम देण्याची घोषणा केल्याप्रमाणे देण्याचे कारखानदारांनी मान्य केले आहे.
साखरेच्या उतरत्या दरामुळे अडचणीत सापडलेल्या कारखान्यांना बगॅस, मोलॅसीस, इथेनॉल, को-जनरेशन या उपपदार्थांनी सावरले होते. तोपर्यंत गेल्या पंधरा दिवसांत बगॅसचे दर प्रतिटन २२०० रुपयांवरुन १६९० रुपये झाला आहे. प्रतिटन पाचशे रुपयांनी कारखानदारांना फटका बसला आहे. ही तूट भरुन काढण्याचेही मोठे आव्हान आहे.
मोलॅसीसचे दर प्रतिटन तीन हजार रुपयांनी कमी झाले आहेत. हंगाम सुरू झाला, त्यावेळी प्रतिटन सहा हजार ५०० रुपये होता. तो सध्या तीन हजार ५०० रुपये झाला आहे.साखर कारखाने इथेनॉलही तयार करत आहेत. तसे पाहिले तर, साखरेचे दर गडगडतात त्यावेळी ब्राझीलसारखा देश इथेनॉल निर्मितीला सर्वाधिक पसंती देतो.तेथील सरकारचेच तसे धोरण असल्याने साखरेचे दर गडगडले तरी, साखर उद्योग कधीच अडचणीत येत नाही. तेथे पेट्रोलमध्ये सक्तीने इथेनॉलचा वापरही केला जातो.
को-जनरेशन प्रकल्प : दरामुळे अडचणीत
विजेची टंचाई दूर करण्यासाठी को-जनरेशन (सहवीज) प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने प्रोत्साहन म्हणून ६ रुपये ५३ पैशांनी खात्रीशीर वीज खरेदीची शासनाने हमी दिली होती. म्हणूनच जिल्ह्यात असे प्रकल्प वाढले. सध्या विजेचा पुरवठा चांगला झाल्यामुळे राज्य सरकारची भूमिका लगेच बदलल्याचे दिसत आहे. गतवर्षी सरकार कारखानदारांकडून प्रतियुनिट ६ रुपये ५३ पैसे दराने वीज खरेदी करीत होते. यामध्ये प्रति युनिट २९ पैसे दर कमी होऊन तो ६ रुपये २४ पैसे प्रति युनिट झाला आहे.
साखरेबरोबरच बगॅस, मोलॅसीस, इथेनॉलचे दर उतरले आहेत. दर उतरले असताना साखरेसह उपपदार्थांची विक्री करु नये, हे आम्हालाही कळते. पण, शेतकºयांची बिले आठ दिवसात द्यावी लागतात, त्यासाठी पैस कुठून जमा करणार आहे. तसेच भविष्यात साखरेसह उपपदार्थाचे दर वाढतील याचीही खात्री नाही. या अडचणीवर सरकारनेच ठोस आणि दीर्घ स्वरुपाचे धोरण तयार करण्याची गरज आहे
- अरुण लाड, अध्यक्ष, क्रांती साखर कारखाना, कुंडल
सुगीच्या दिवसात सर्वच शेतीमालाचे दर पडतात. त्यानुसारच साखर, बगॅसचे दर गडगडले आहेत. कारखानदारांनी साठे करुन ठेवावेत. आता तर २५ टक्के साखर प्रति क्विंटल ३२०० रुपयांनी खरेदीचा शासनाने निर्णय घेतला आहे. यामुळे साखर कारखान्यांनी साखर विक्री, बगॅस, मोलॅसीस विक्रीसाठी साखर कारखान्यांनी गडबड करु नये. भविष्यात निश्चित साखरेचे दर वाढतील
- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना