‘कृष्णे’वर बहे-बोरगावचा दबदबा; ‘रयत’च्या झेंड्याला निष्ठेचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:27 AM2021-01-08T05:27:14+5:302021-01-08T05:27:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलचे बहे, बोरगाव, रेठरे हरणाक्ष, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलचे बहे, बोरगाव, रेठरे हरणाक्ष, इस्लामपूर गटात पाच संचालक आहेत. माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांना काहींनी सहानुभूती दाखवत तयारी सुरू केली आहे, तर रयत पॅनेलचे डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यावरील निष्ठेच्या जोरावर काही निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
बोरगाव येथील जितेंद्र पाटील हे डॉ. सुरेश भोसले यांचे समर्थक मानले जातात. मागील निवडणुकीत सत्ता आली, त्यावेळी भोसले यांनी पाटील यांच्याकडे कारभार सोपविला होता. त्यानंतर कुठे माशी शिंकली हे आजही गुलदस्त्यात आहे. नंतर राष्ट्रवादीचे लिंबाजी पाटील उपाध्यक्ष झाले. त्यातील राजकीय गुपितही उलगडले नाही. मात्र, लिंबाजी पाटील उपाध्यक्ष झाल्यानंतर कऱ्हाड तालुक्यातील सहकार गटात अस्वस्थता पसरली होती.
या परिसरात सहकार पॅनलचे वर्चस्व आहे. जितेंद्र पाटील, सुजित मोरे, अमोल गुरव, जयश्री पाटील आणि इस्लामपुरातील संजय पाटील हे विद्यमान संचालक आगामी निवडणूक लढवतील. परंतु, सहकार पॅनलमध्ये गटबदलू नेत्याची संख्या मोठी आहे. याचा फायदा राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते यांना होण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे उदय शिंदे, मानाजी पाटील, युवराज पाटील यांसह काही युवकांची फळी आहे. इंद्रजित मोहिते यांच्याकडे दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्यावर निष्ठा असलेले नगरसेवक आनंदराव मलगुंडे, मऱ्हाटमोळा संस्थेचे सुरेंद्र पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, माजी संचालक संपतराव सावंत, संपतराव पाटील, आदी कार्यकर्त्यांची फळी राहिली आहे. रयत पॅनलमधून बाहेर पडलेले माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांचा फायदा सहकार पॅनलला होणार आहे.