इस्लामपुरातील जमीन घोटाळ्यातील आठ जणांचे जामीन फेटाळले; मंडल अधिकारी, तलाठ्याचा समावेश
By श्रीनिवास नागे | Published: October 17, 2022 05:50 PM2022-10-17T17:50:21+5:302022-10-17T17:50:54+5:30
विजय बापू पाखरे (वय ५४, रा. इस्लामपूर, सध्या रा.शेरे-कराड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यातील १० जणांविरुद्ध फसवणुकीसह दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला.
सांगली : इस्लामपूर शहरातील सर्वे नंबर ५४ मधील १२ गुंठे जागा मालकाच्या संमतीशिवाय परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश राजश्री परदेशी यांनी आज सर्व आठ संशयितांचे अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्याचा निकाल दिला. विजय बापू पाखरे (वय ५४, रा. इस्लामपूर, सध्या रा.शेरे-कराड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यातील १० जणांविरुद्ध फसवणुकीसह दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला.
यातील मुख्य संशयित विजय संभाजी जाधव (रा. इस्लामपूर) अद्याप परागंदा आहे, तर निलेश संपत बडेकर अटकेनंतर न्यायालयातून जामिनावर मुक्त झाला आहे. इतर ८ जणांनी येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यांना न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला होता. दोन दिवसांपूर्वी यावर पुन्हा सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील शुभांगी पाटील, रणजीत पाटील आणि पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी युक्तिवाद करत फसवणुकीच्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी या आठ जणांचे जामीन कायम न करता त फेटाळावेत अशी मागणी केली होती.आजज्ञ न्या. परदेशी यांनी सर्वांचे जामीन अर्ज फेटाळल्याचा निर्णय दिला.
जामीन फेटाळलेल्यात सुजित दिलीप थोरात (रा. महादेवनगर, इस्लामपूर), सोमनाथ बाळासाहेब माने (रा. नेर्ले), कुलदीप जाधव (रा.बुरुंगवाडी ता. पलुस), अरुण राजेंद्र गवळी (रा. इस्लामपूर), कीर्तीकुमार आण्णा पाटील (रा. ऐतवडे बुद्रुक), विठ्ठल मारुती कांबळे (तत्कालीन तलाठी, इस्लामपूर), संभाजी दत्तात्रय हांगे (तत्कालीन मंडल अधिकारी, इस्लामपूर) आणि सुरेश आण्णा सावंत, (काळमवाडी) यांचा समावेश आहे.