बाला रफिक शेखने मारले विट्याचे कुस्ती मैदान, अवघ्या एका मिनिटात इराणच्या मल्लास केलं चितपट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 04:35 PM2022-04-26T16:35:09+5:302022-04-26T16:40:42+5:30
महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याने इराणचा जागतिक विजेता मल्ल अली याला अवघ्या एका मिनिटात दुहेरी पट डावावर चितपट केले. त्याला पहिल्या क्रमांकाचे १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
विटा : येथील ग्रामदैवत श्री नाथाष्टमी उत्सवानिमित्त विटा येथे झालेल्या कुस्ती आखाड्यात बाला रफिक शेखने कुस्ती मैदान मारले. पुणे येथील हनुमान आखाड्याचा मल्ल महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याने इराणचा जागतिक विजेता मल्ल अली याला अवघ्या एका मिनिटात दुहेरी पट डावावर चितपट केले. त्याला पहिल्या क्रमांकाचे १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
या मैदानाचे पूजन विटा अर्बन बॅँकेचे उपाध्यक्ष विलासराव कदम यांच्याहस्ते झाले. या कुस्ती मैदानात सुमारे दीडशेहून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, विशाल पाटील, आप्पा पाटील, दत्ता साठे, पांडूरंग पवार, सतीश पाटील, सुभाष मेटकरी, सुरेश शितोळे, शहाजी भोसले उपस्थित होते.
या कुस्ती मैदानात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पुणे येथील दांगट आखाड्याचा मल्ल नॅशनल चॅम्पियन माऊली कोकाटे विरूध्द विष्णू खोसे यांच्यात झाली. यावेळी माऊलीने घिस्सा डावावर विष्णू खोसे यास चितपट करून १ लाख २५ हजाराचे इनाम जिंकले. तिसऱ्या क्रमांकासाठी विटा येथील आदर्श कुस्ती संकुलाचा मल्ल अभिजीत मोरे याने पुणे येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचा मल्ल प्रसाद सुस्ते यास निकाल डावावर आसमान दाखवित एक लाखाचे बक्षीस जिंकले.