विधवा प्रथा झुगारणारी 'बलगवडे' ठरली सांगली जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत, राज्यात चौथी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 04:03 PM2022-05-20T16:03:02+5:302022-05-20T16:04:03+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचे अनुकरण करत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेच्या उच्चाटनाचे ठराव करावेत अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याचे अनुकरण सर्वत्र होऊ लागले आहे.
सांगली : बलगवडे (ता. तासगाव) ग्रामपंचायतीने आज, शुक्रवारी (दि. २०) झालेल्या मासिक सभेत विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर केला. असा ठराव करणारी सांगली जिल्ह्यातील ही पहिली तर राज्यातील चौथी ग्रामपंचायत ठरली आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव आणि अकोला जिल्ह्यातील ढोरखेड ग्रामपंचायतींनी असा ठराव मंजूर केला आहे.
सरपंच जयश्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. ग्रामसेवक विजयकुमार पाटील यांनी १७ मेरोजीचा विधवा प्रथेविरोधातील शासन निर्णय वाचून दाखविला. त्यानुसार चर्चेअंती मीनाताई पाटील यांनी ठराव मांडला. सारिका बुधावले यांनी अनुमोदन दिले. सर्वसहमतीने ठराव मंजूर करण्यात आला.
हेरवाड ग्रामपंचायतीचे अनुकरण करत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेच्या उच्चाटनाचे ठराव करावेत अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याचे अनुकरण सर्वत्र होऊ लागले आहे. सांगली जिल्ह्यात बलगवडे ग्रामपंचायत ठराव करणारी पहिली ठरली आहे. त्यात म्हंटले आहे की, विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे यासाठी विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. महिलांच्या सहभागातून यासंदर्भात गावात जनजागृती करण्यात येईल.
बलगवडेमध्ये याकामी अनिल पाटील, उपसरपंच श्रीकांत मोहिते, माजी उपसरपंच उध्दव शिंदे, सदस्य धनाजी शिंदे, महादेव माळी, सुवर्णा शिंदे, सचिन पाटील, माजी सरपंच सूर्यकांत थोरात, अजित जाधव आदींनी पुढाकार घेतला. अंनिसतर्फे राहुल थोरात यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.