बिकट काळातील संतुलित अर्थसंकल्प : विश्वजित कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:29 AM2021-03-09T04:29:39+5:302021-03-09T04:29:39+5:30
कडेगाव : कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या अतिशय बिकट काळातही समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा संतुलित अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकारने सादर ...
कडेगाव :
कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या अतिशय बिकट काळातही समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा संतुलित अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकारने सादर केला आहे, अशी प्रतिक्रिया सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक मंदीशी लढा देताना कृषी क्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. तसेच आरोग्य व्यवस्था अधिक सदृढ करायची गरज देखील अधोरेखित झाली आहे. या दोन्ही घटकांना राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सार्थ प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी भरीव तरतूद केली आहे.
कृषी क्षेत्रासाठी तरतुदींमध्ये ११.७ टक्क्यांची वाढ केली आहे. कृषी मालाला अधिकाधिक भाव देण्यासाठी सरकार वचनबद्ध असून ‘एपीएमसी’ बळकटीकरणाला दोन हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील कृषी महाविद्यालयांमधील संशोधनासाठी देखील प्रतिवर्षी २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
खेडोपाडी शिक्षणासाठी एसटी बसचा वापर करणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत मोफत एसटी सेवा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहरी परिसरात रिंग रोड, उड्डाणपूल अशा आधुनिक दळणवळणाच्या सेवादेखील विस्तारण्यात येणार आहेत.
वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात राजीव गांधी तंत्रज्ञान पार्क विकसित करणार आहे. पुढील पिढी घडविण्यासाठी ही अतिशय चांगली योजना आहे. ऊस तोडणी कामगार त्याचप्रमाणे घरेलू कामगार यांच्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. सामाजिक न्याय आणि हिताचे रक्षण करण्यासाठी कल्याणकारी योजना सादर केल्या आहेत.