संतुलित आहार हाच इम्युनिटी बुस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:34 AM2021-02-27T04:34:29+5:302021-02-27T04:34:29+5:30
राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील जीवन जगत असताना मानवाला नवी आशा आणि नवी दिशा ही त्याच्यावर ओढवलेल्या प्रत्येक संकटातून मिळत असते. ...
राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
जीवन जगत असताना मानवाला नवी आशा आणि नवी दिशा ही त्याच्यावर ओढवलेल्या प्रत्येक संकटातून मिळत असते. उद्याचा दिवस आजच्या दिवसापेक्षा जास्त आशादायी असणार आहे असे प्रत्येकाला वाटत असते आणि प्रत्येक जण याच सोनेरी स्वप्नांवर आपल्या वर्तमानकाळातील संकटांना तोंड देत असतो. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे यासारख्या किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी किती अवघड आहेत आणि काही लोकांचे बेजबाबदार वागणे काही लोकांच्या जीवावर कसे बेतले याचा आपण याची देही याची डोळा अनुभव घेतला. या धकाधकीच्या, तीव्र स्पर्धेच्या युगात व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले राहणे ही गोष्ट दुरापास्त झाली आहे. इम्युनिटी बूस्टर, इम्युनिटी पॉवरसारखे शब्द कानावर पडू लागले. कोरोनासारख्या संसर्गापासून वाचण्यासाठी हा काढा प्या, त्या गोळ्या खा अशा संदेशांचा सोशल मीडियावर सुळसुळाट सुरू झाला. गरम पाणी पिणे, सांज-सकाळ वाफ घेत राहणे यासारखे प्रयोग सुरू झाले. प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार तो म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. कोरोनाने आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये परंपरागत चालणाऱ्या कित्येक रूढी, प्रथा कोरोनाशी दोन हात करायला किती सुसंगत आहेत हे दाखवून दिले. एकमेकांना भेटताना दोन्ही हात जोडून नमस्कार करण्याची प्रथा तर पूर्ण जगभरात अमलात आणली जात आहे. आपल्या चप्पल दरवाजाच्या बाहेर काढणे, घरामध्ये चपला घालून न फिरणे, घरात प्रवेश करण्यापूर्वी हात, पाय, तोंड स्वच्छ धुऊन घरात प्रवेश करणे, हात न धुता काहीही न खाणे यासारखे संस्कार कोरोनाबरोबर जगत असताना आपल्या जगण्याचा भाग बनले. कोरोनाने भारतीयांना आहाराबद्दल सर्वात मोठी दिशा दिली. म्हणजे आपल्या समृद्ध प्रथा, परंपरा सोडून ज्यांची गाडी पाश्चिमात्य संस्कृतीकडे निघाली होती त्या गाडीला पुन्हा मूळ दिशेला वळवण्याचे काम कोरोनाने केले.
‘जसा आहार तसा विचार’ असे म्हटले जाते. माणूस जसा आहार घेतो तसेच त्याचे विचार आणि आचार असतात, असे म्हटले जाते. माणसाचे आरोग्य आचार, विचार हे सर्व तो घेत असलेल्या आहारावरच अवलंबून असते. अन्न औषध म्हणून सेवन करा, असे आयुर्वेदात म्हटले आहे. आहार जर औषध समजून घेतला तर सर्व उपयुक्त घटकांचा समावेश आणि अपायकारक घटकांना निषिद्ध मानले तर शरीराची योग्य वाढ होण्याबरोबरच अनारोग्य दूर ठेवणे सहज शक्य आहे. म्हणूनच आहाराचे आरोग्य रक्षणातील महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे.
सात्त्विक आहार असेल तर माणूसही सात्त्विक बनतो. तामसी माणसाचा आहार हा वेगळाच असतो. मांसाहार करणारा माणूस पशुतुल्य व्यवहार करतो. कारण जसा आहार तसा विहार. म्हणून आहार कोणता घ्यावा, किती घ्यावा, का घ्यावा याचे शास्त्रीय ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टींचा पुन्हा नव्याने विचार कोरोनाकाळात होऊ लागला.
अन्नेन पूरयेत् अर्धं तोयेन तु तृतीयकम्।
उदरस्य तुरीयंशं सम्रक्षेत् वायुचारणे॥५-२२॥
घेरण्डसंहितामधील पाचव्या अध्यायात आहार घेत असताना आपल्या पोटाचा अर्धा भाग अन्नाने भरावा, तिसरा भाग हा पाण्याने आणि राहिलेला पाव भाग हा वायूचा संचार व्हायला मोकळा असावा असे म्हटले आहे. म्हणजे थोडक्यात भुकेला चार घास कमी खा ही आपली परंपरागत शिकवण. जास्तच इफेक्टिव्ह भाषा वापरायची तर ग्रामीण भागात पोटाला तड लागेपर्यंत जेऊ नकोस असे म्हटले जाते.
सत्त्व, रज व तम हे तीन गुण (त्रिगुण) आहेत. सर्व प्राणिमात्रांना आवडणारा आहारदेखील वरील तीन प्रकारचा असतो. सात्त्विक, राजसिक आणि तामसिक आहार.
यामध्ये सात्त्विक आहार हा आयुष्य, बुद्धी, शक्ती, आरोग्य, सुख व प्रेम वाढवणारा असून, रुचकर, स्निग्ध, शरीरात मुरून चिरकाल राहणारा आणि मन प्रसन्न ठेवणारा असतो.
सात्त्विक आहार : ताजी फळे, भाज्या, धान्य, सलाड इ., मूग, नाचणी, भाज्यांची सूप्स, ज्यूस, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा, गूळ, मध, सात्त्विक मसाले (तुलसी, वेलची, दालचिनी, धणे, बडीशेप, आले आणि हळद वगैरे..)
राजसिक आहार : मिठाई, खूप तळलेले/ जास्त तिखट/ चमचमीत/ तेलकट पदार्थ, लोणचे वगैरे.
तामसिक आहार : मांसाहारी पदार्थ, शिळे/ दुर्गंधीयुक्त पदार्थ, बऱ्याच वेळा गरम केलेले पदार्थ, कांदा, मुळा, लसूण, अंडी वगैरे.
यापूर्वी केवळ जिभेचे चोचले पुरविणे, पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू होते आणि पिझ्झा, पास्ता, बर्गरसारखे पदार्थ लोकांच्या आहाराचे अविभाज्य घटक बनले होते. गहू भिजवून, वाळवून दळून आणणे, त्याची सोजी काढणे, त्याची कणिक मळून त्याच्या शेवया करण्याची परंपरागत पद्धत जाऊन त्याची जागा मॅगीसारख्या दोन मिनिटांत होणाऱ्या फुडपॅकने घेतली. या अयोग्य, अधिक किंवा अतिखाण्याने आपण अनारोग्य ओढवून घेतो. याचा साक्षात्कार कोरोनाने करून दिला.
अन्न तारी, अन्न मारी,
अन्न नाना विकार करी…
असे म्हटले जाते ते याचसाठी. माणूस मरत नाही, तो स्वत:ला मारतो असे म्हटले जाते. चार पांढऱ्या राक्षसापासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. साखर, मीठ, मैदा आणि चरबीयुक्त आहार हे ते चार पांढरे राक्षस होत. काहींनी याच राक्षसांना विषाची उपमाही दिली आहे. काय खावे आणि काय खाऊ नये हा ज्याचा-त्याचा प्रश्न असला तरी आयुर्वेदानुसार शाकाहारच योग्य सांगितला आहे. शास्त्रीय मीमांसा वाचल्यास शाकाहारच उत्तम योग्य आणि सर्वश्रेष्ठ सांगितला असून आरोग्यपूर्ण, जीवनदायी आणि दीर्घायुष्य प्राप्त करून देणारा आहे हे आपल्या लक्षात येईल. या क्षेत्रात जे संशोधन झालेले आहे त्याचा विचार केला तर असे दिसते की, शाकाहारात प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे, क्षार हे अधिक असतात. अपाच्य (पचणार नाहीत असे) घटक आणि चरबी नसते. शाकाहार सुपाच्य असल्याने पचनेंद्रियांवर कमीत कमी ताण पडतो आणि त्यामुळे इंद्रिये अनेक वर्षे सक्षम राहतात. याशिवाय शाकाहारी अन्नघटकांचे शोषण आणि अभिसरण जलद होते. शाकाहाराने अवाजवी वजन वाढण्याची शक्यता कमी असते. शाकाहारात मांसाहारापेक्षा अधिक ऊर्जा असते असे आढळून आले आहे. शंभर ग्रॅम मांसात ११८ कॅलरीज असतात तर १०० ग्रॅम बीन्समध्ये १५८ कॅलरीज असतात. १०० ग्रॅम सर्व कडधान्यांत २०० कॅलरीज असतात. तर १०० ग्रॅम सर्व प्रकारच्या सुक्या मेव्यामध्ये ४०० कॅलरीज असतात. यावरून असे म्हणता येईल की, शाकाहारी पदार्थांत ऊर्जाशक्ती ही मांसाहारी पदार्थांपेक्षा जास्त असते. परंतु ते पचण्यासाठी शरीरातील खर्च होणारी ऊर्जा मात्र मांसाहाराच्या पचनास लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा कमी लागते. तसेच दोन्ही आहाराच्या किमतीत खूप फरक दिसून येतो. मांसाहारापेक्षा शाकाहार त्यामानाने स्वस्त असल्याचे दिसून येते. शिवाय कोंबड्यांपासून संसर्ग वाढतो अशी अफवा पसरल्यावर कित्येक पोल्ट्री व्यावसायिकांनी घाबरून कोंबड्या तशाच सोडून दिल्या, काहींनी त्या अक्षरशः पुरून टाकल्या. कोरोनामुळे खूप लोकांचा आहार कल शाकाहाराकडे झुकू लागला हे मात्र खरे आहे. खरे तर आहार निवडताना शाकाहाराचीच निवड करणे योग्य आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते शाकाहार हाच सर्वोत्तम आहार आहे.
सात्त्विक आणि मिताहार बरोबर ही समस्या सूर्यनमस्कार योगासने, प्राणायाम आणि घरगुती उपचारांनी सुधारता येते. यासाठी आजीचा बटवा नक्कीच कामी आला. या बटव्यातील लवंग, दालचिनी, तीळ, जिरे, मिरे, गूळ, लसूण, आले यासारख्या पदार्थांचा वापर सर्दी, ताप, अंगदुखीसारख्या छोट्या छोट्या आजारांना बाय बाय करायला केला जाऊ लागला.
लॉकडाऊनच्या काळात खूप व्यक्तींनी निष्क्रियपणे घरी राहून तसेच वेगवेगळ्या चमचमीत पदार्थांवर ताव मारून लठ्ठपणा वाढीस लागला. स्ट्रेस बेली एक असा प्रकार आहे, ज्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस आणि हार्मोन्स आपल्या वजनाला प्रभावित करत असतात. त्यामुळे संतुलित आहार महत्त्वाचा आहे.
व्हिटामीन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास नक्कीच फरक जाणवतो. पोट कमी करण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते. त्यासाठी फळे, ताज्या भाज्या, गरम पाणी, लिंबू यांचा आहारात समावेश करणे शिवाय झोप पूर्ण करणे यादेखील आहाराच्या जोडीने महत्त्वपूर्ण अशा गोष्टी आहेत.
मुळात काही लोकांना वाटते की रोगप्रतिकारशक्ती वाढवायला जास्त अन्न सेवन केले पाहिजे. पण आयुर्वेदात मिताहारचा दाखला दिला गेला आहे. कमी जेवून कधी अशक्तपणा येत नाही आणि जास्त जेवून कधी जास्त ताकद मिळत नाही. जास्त जेवून ताकद येते हा मोठ्ठा गैरसमज आहे.
आपल्या शरीरात गजर लावून दिलेले आहेत, ते समजून घेणे गरजेचे आहे. आपल्याला मिळालेली ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन आपल्याला याबद्दल पदोपदी जाणीव करून देत असतात. पोट भरल्यानंतर ढेकर येतो, तो म्हणतो तिथेच थांब, नाहीतर नंतर काही झालं तर मला म्हणजे शरीराला दोष देऊ नकोस. आपल्या शरीराचे काही नियम आहेत ते नाही पाळले तर शिक्षा ही होणारच. शरीराचा हा नियम ओळखला पाहिजे.
आपण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आपला आहार हा नेहमी पचण्यासाठी हलका (लवकर पचणारा) असावा. विशेषत: ज्वारीची भाकर, मूगडाळीचे वरण, भात, दोडका, भेंडी, पालक, मेथी यांचा दैनंदिन आहारात नियमित वापर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते.
या कोरोनाकाळात हॉटेल बंद असल्याने बाहेरचे पदार्थ खाणे पूर्ण बंद झाले. या मसालेदार पदार्थांमुळे शिवाय जंक फूड, एअरेटेड पेय, कृत्रिम रंग घातलेले पदार्थ, बाहेर खाल्लेले थंड-कच्चे पदार्थ अशा प्रकारचे अनेक पदार्थ आजारांना कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक आहेत, याचा कोरोनामुळे का होईना पुन्हा नव्याने साक्षात्कार झाला. आपल्या शरीराराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी
- जिरे, पुदिना, हळद, ओवा, तुळस, आले, लसूण...यासारखे पदार्थ
- हिरव्या पालेभाज्या, विशेषत: मेथी, कांद्याची पात आणि पालक...
- टोमॅटो, बीट आणि लाल भोपळा
- द्राक्षे, बेरी, आलुबुखार, सुकवलेले आलुबुखार, त्याचप्रमाणे लिंबू , संत्रे, मोसंबी इत्यादी सायट्रस फळे
- दही आणि कडधान्य
यासारख्या पोषक अन्नाचे सेवन करण्याचे महत्त्व लोकांना पटू लागले.
अन्न हे प्रतिजैविक (अँटिबायोटिक), जीवाणूरोधक (अँटी-बॅक्टेरिअल) आणि अँटी-इन्फेक्टिव्ह घटक म्हणून काम करते. त्यामुळे घरचे अन्न हेच सर्वोत्तम प्रतिकारशक्ती वाढवणारे असते. आणि जेव्हा प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात देण्यात येतात, तेव्हा हे पदार्थ हा आपलाच एक घटक मानून शरीर त्यांचा स्वीकार करते आणि त्यांचा परिपूर्ण वापर करते.
आपली प्रतिकारशक्ती सक्षम असेल तर कोणत्याही प्रकारच्या आजाराची लागण होत नाही आणि आपला आहार यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आहारात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय खावे, कधी खावे आणि किती खावे. याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज कोरोनामुळे तीव्रपणे निर्माण झाली.
भारतीय पद्धतीनुसार सकाळीच पोट भरून जेवण करणे महत्त्वाचे आहे, सकाळी एकदा पोट भरून जेवण केले की दिवसभर काम करण्यासाठी उत्साह आणि एनर्जी टिकून राहते.
दुपारी मात्र हलके-फुलके जेवण करणे. विशेषत: दुपारच्या जेवणामध्ये फळे, फळांचा रस, कोशिंबिरी, पालेभाज्या, पालेभाज्यांचे सुप, ड्रायफ्रुट्स, उसळी यांचा अवश्य समावेश करायला हवा.
संध्याकाळी एकदम साधे जेवण करणे गरजेचे आहे. एखादी पोळी किंवा भाकरीसोबत दोन वाटी वरण किंवा एक-दीड वाटी खिचडी व लसूण-आले घालून बनविलेली खिचडी. या पद्धतीने साधा सुपाच्य आहार घ्या. अथवा खरे तर रात्री जेवण बंद करून टाकणे कधीही उत्तम. मांसाहार, फास्टफूड, बाहेरचे पदार्थ, हॉटेलचे जेवण खायचे असेल तर अत्यंत मर्यादित प्रमाणात खाणे आवश्यक आहे. शक्यतो आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरीरात विकार निर्माण होतात. आहाराबरोबर आपले राहणीमान योग्य असणे फार महत्त्वाचे आहे, सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे, दुपारी थोडीशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणेही आवश्यक आहे. चालणे, पळणे, सूर्यनमस्कार, योगासने, एरोबिक्स, पोहणे, सायकल चालवणे आदी व्यायाम केलेच पाहिजेत. शिवाय या व्यायामात नियमितता व सातत्य असावे. दर दोन-तीन महिन्यांनी व्यायाम प्रकारात बदल जरूर करावा. आधुनिक जीवन पद्धतीच्या नावाखाली आपण शरीरावर मनमानी करतो आणि त्याचा परिणाम म्हणून प्रतिकारशक्ती यंत्रणा बिघडते. परिणामी अनेक रोगांना सामोरे जावे लागते... भविष्यात कोरोनासारखे अनेक विषाणू मानवाला सळो की पळो करून सोडणार नाहीत कशावरून? त्यामुळेच आताच वेळ आली आहे. अन्न हे पूर्णब्रह्म म्हणूनच त्याचे सेवन करण्याची, त्याचा आदर राखण्याची....
- राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
ई-मेल :- rajashreep80@gmail.com