बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार अनिल बाबरांनी शिवसेना सोडण्याचे सांगितले कारण, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 02:26 PM2023-01-09T14:26:10+5:302023-01-09T19:21:53+5:30
भाजप सोबत जाण्याचंही सांगितलं कारण
दिलीप मोहिते
विटा (सांगली) : मी ज्या पक्षात होतो, त्या पक्षाचे प्रमुख आम्हाला कधी भेटतच नव्हते. त्यामुळे पक्षनेतृत्वाबाबत मोठी नाराजी होती. आजकालची राजकीय परिस्थिती पहाता कुठल्याही एका राजकीय पक्षात राहण्याचे दिवस राहिलेले नाहीत, असे विधान खानापूर विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार अनिल बाबर यांनी केले.
गार्डी (ता.खानापूर) येथील नवोदित साहित्यीक विजय बाबर यांच्या ‘ठेच’ या पुस्तकाचे प्रकाशन आ. बाबर यांच्याहस्ते व साहित्यिक प्रा. व. बा. बोधे आणि ग्रामीण कथाकार बा. ग. केसकर यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी साहित्यीक प्रा. बोधे यांनी यांनी माझ्या राजकारणातील एका मित्राने मला मी कॉँग्रेसमधून आता राष्ट्रवादीत आलो, परंतु, तेथेही काही बरे चाललेले नाही.
त्यामुळे मी आता कोणत्या पक्षात जाऊ? असा सल्ला विचारला. त्यावेळी मी त्याला सांगितले की, बाबारे, तुझे सर्व पक्ष आता फिरून झाले असतील तर तू आता तमाशा पार्टीत जा. हाच मुद्दा पकडत आ. बाबर यांनी शिवसेना पक्ष सोडण्याचे कारण सांगितले.
बाबर म्हणाले, मी ज्या पक्षात होतो, त्या पक्षाचे प्रमुख आम्हाला कधी भेटतच नव्हते. ते आजारी असल्याचे सांगितले जायचे. पण त्यांचा ३२ वर्षाचा मुलगा धडधाकट होता. त्याला फिरायला काय झाले होते? आता सगळीकडे फिरत आहेत. आता सध्या कोरोनाची परिस्थिती नाही काय? राज्यसभेच्या निवडणूकीला शिवसेनेच्या उमेदवाराला मते कमी पडली. त्यावेळी मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र पाठविले होते.
महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी पुरेशी मते असतानाही शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यावेळी मी याबाबत पक्षपातळीवर विचार झाला पाहिजे, अशी लेखी पत्राव्दारे मागणी केली होती. परंतु, त्याची तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भारतीय जनता पार्टीवर आम्हाला विश्वास वाटल्याने आम्ही त्यांच्या सोबत गेलो, असे अनिल बाबर यांनी शिवसेना पक्ष सोडण्याची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बंडोपंत राजोपाध्ये, शरद बाबर, हेमंत बाबर यांच्यासह नागरीक उपस्थित होते.