मिरजेत बालगंधर्व नाट्यगृह अखेर सुरु
By admin | Published: July 7, 2015 11:33 PM2015-07-07T23:33:16+5:302015-07-07T23:33:16+5:30
नाट्यप्रेमींच्या आंदोलनास यश : तहसीलदारांकडून महापालिकेस परवाना
मिरज : तांत्रिक अडचणीमुळे गेले चार महिने बंद असलेल्या बालगंधर्व नाट्यगृहास तहसीलदारांनी परवाना दिल्याने नाट्यगृह सर्वांसाठी खुले झाले आहे. परवाना मिळाल्यानंतर नाट्यकलाकार व रसिकांनी महाराणा प्रताप चौकात फटाके उडवून जल्लोष केला. तसेच बालगंधर्व नाट्यगृहात नटसम्राट बालगंधर्व यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारलेल्या बालगंधर्व नाट्यगृहास पूर्णत्वाचा दाखला, अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला, विद्युत पुरवठा तपासणी दाखला नसल्याने बालगंधर्व नाट्यगृहास परवाना मिळाला नव्हता. त्यामुळे गेले सहा महिने नाट्यगृह बंद होते. नाट्यगृह सुरू व्हावे यासाठी नाट्यकलाकार व रसिकांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनाने नाट्यगृह दाखल्यासाठी आवश्यक सोपस्कार पूर्ण केले.
आ. सुरेश खाडे यांनी आज तहसील किशोर घाडगे, महापालिका उपायुक्त सुनील नाईक, रमेश वाघमारे, अग्निशमन अधिकारी शिवाजीराव दुधाळ यांच्यासोबत बैठक घेतली. सप्तरंगी सहयोगी कला मंचचे अध्यक्ष ओंकार शुक्ल, प्रशांत गोखले, दिगंबर कुलकर्णी, विनायक इंगळे, धीरज पलसे यांसह कलाकार बैठकीस उपस्थित होते. त्रुटींची पूर्तता करण्यात आल्यानंतर तहसीलदारांनी महापालिकेस नाट्यगृह परवाना दिला. यामुळे बंद नाट्यगृह पुन्हा सुरू होणार आहे.
बंद नाट्यगृह सुरु करण्यासाठीच्या आंदोलनाला यश मिळाल्याने ओंकार शुक्ल, सचिन चौगुले, प्रशांत गोखले, धीरज पलसे, वैशाली गोडबोले, ऋषिकेश कुलकर्णी, विनायक इंगळे, दिगंबर कुलकर्णी, प्रतीक धुळूबुळू, प्रशांत बेळंकी, अमोल कांबळे, हेमंत वायदंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी श्रीकांत चौकात फटाके वाजवून जल्लोष केला.
‘बालगंधर्व’मधील पहिला प्रयोग म्हणून दि. १२ रोजी ‘छु मंतर’ हा वसंत कानेटकर लिखित प्रयोग सादर करण्यात येणार आहे. बुधवार दि. १५ रोजी बालगंधर्व पुण्यतिथीनिमित्त ‘नमन नटवरा’ हा कार्यक्रम, नाट्यगीते, नृत्य, भक्तिगीत, भावगीत सादरीकरण व बालगंधर्व प्रतिमापूजन करण्यात येणार आहे.
बालगंधर्वांच्या प्रतिमेचे पूजन नाट्यकला उपासक ऋषिकेश बोडस, शरद जाधव व नाट्य परिषद मिरज शाखेचे अध्यक्ष हनुमंत गाडगीळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने ‘सरकारी थिएटर ते बालगंधर्व नाट्यगृह एक प्रवास’ या विषयावर मानसिंग कुमठेकर यांचे व्याख्यान व मिरजेचा इतिहास सांगणाऱ्या वस्तूंचे व ग्रंथ प्रदर्शन होणार आहे. विजय कुलकर्णी, शरद बापट, रवींद्र फलटणकर, नीलेश जोशी, भालचंद्र काशीकर, स्मिता महाबळ, विजय गोखले, मेधा सोहनी, ऋषिकेश चौगुले, पवन कुलकर्णी, विशाल कुलकर्णी, राजू सुपेकर यात सहभागी होणार आहेत.
धनंजय जोशी, राजेंद्र नातू, संजय रूपलग, तानाजी कागवाडे, ऋषिकेश देसाई, मारुती गायकवाड, डॉ. विनिता करमरकर, सुबोध गोरे, बाळासाहेब मिरजकर, सुधीर गोखले, विकास कुलकर्णी, श्रेयस गाडगीळ यांनी संयोजन केले आहे.