बळीराजा : जगाचा पोशिंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:23 AM2020-12-23T04:23:35+5:302020-12-23T04:23:35+5:30
लॉकडाऊन! आपला देशच नव्हे, तर सर्व जगच थांबलेले. सर्व उद्योगधंदे बंद, सर्व कारखाने बंद, सर्व वाहतूक बंद, परप्रांतीय कामगार ...
लॉकडाऊन! आपला देशच नव्हे, तर सर्व जगच थांबलेले. सर्व उद्योगधंदे बंद, सर्व कारखाने बंद, सर्व वाहतूक बंद, परप्रांतीय कामगार बंधूंचे परतीच्या प्रवासात झालेले हाल, अपघात अशा अनंत गोष्टी आपण सर्वांनी ऐकल्या, अनुभवल्या, सर्व जग ठप्प झालेले, जणू काय पृथ्वीची गतीच थांबलेली.
रोज नवनवीन थरकाप होणाऱ्या बातम्या ऐकल्या, अनेक सगेसोयऱ्यांचे हाल ऐकले, हो फक्त ऐकलेच, पाहता आले नाही. भेटता आले नाही, सांत्वन करता आले नाही आणि फक्त हळहळ व्यक्त करीत राहिलो. अतीव दुःख होत राहिले. अनेकांची ताटातूट झाली. कधी नव्हे ते मन अत्यंत सैरभैर झाले.
पण या सर्व संकटातही ‘भूक’ मात्र थांबली नव्हती अशा अडचणीच्या परिस्थितीतही आणि घशाखाली घास उतरत नसतानाही पोटाच्या खळग्यात थोडेफार तरी अन्न ढकलावे लागत होते. अशा अत्यंत अवघड, निराशाजनक आणि विस्मयक परिस्थितीतही आमची भूक भागविण्यासाठी आपल्या पाठीशी ठामपणे, निर्भयपणे उभा राहिला तो फक्त अन् फक्त शेतकरीच! म्हणून त्याला ‘मुजरा’.
शेतकऱ्यांनाही कोरोना सोडणार नव्हता, नव्हे सोडले नाहीच. त्याने अनेक शेतकऱ्यांना घेरलेही; पण जगाचा पोशिंदा हा बहाद्दर शेतकरी डगमगला नाही, घाबरला नाही. ‘सर्व विश्वची माझे घर’ समजून विश्वातील आपल्या बंधू-भगिनींसाठी महाभयंकर कोरोनास अंगावर घेऊन अन्नधान्य पिकवून पुरवित राहिला. मित्रांनो, प्रसंगी त्याला आपला जीव गमवावा लागला. आपल्या सगे-सोयऱ्यांना गमवावे लागले; पण तो थांबला नाही, तुम्हा-आम्हासाठी कष्ट करीत राहिला... म्हणूनच आजचा दिवस आज आपण पाहत आहोत.
शेतकऱ्याने तुमची-आमची भूक भागवली. अशा या जगाच्या पोशिंदा शेतकऱ्यास जागतिक किसान दिनानिमित्ताने मानाचा मुजरा!
मलाही गर्व आहे मी शेतकरी असल्याचा. (कृषिभूषण डॉ. संजीव माने, आष्टा). (शब्दांकन- सुरेंद्र शिराळकर)