नाशिकच्या बाळकृष्ण कापसे यांना यंदाचा कर्मयोगी पुरस्कार
By शरद जाधव | Published: January 10, 2024 04:52 PM2024-01-10T16:52:39+5:302024-01-10T16:53:13+5:30
१४ ते १८ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन
सांगली : पैठणी व्यवसायाला नावलौकिक मिळवून देत अंध, निराधार व्यक्तींसाठी समाजपयोगी काम करणारे, नाशिक येवला पैठणीचे निर्माते बाळकृष्ण नामदेव कापसे यांना यंदाचा कर्मयोगी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रोख एक लाख रुपये, सन्मान चिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी प्रसिद्ध सिनेअभिनेते आदेश बांदेकर कापसे यांची मुलाखत घेणार आहेत. शांतीनिकेतनमधील लोकरंगभूमी येथे रविवार दि. १४ रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्राचार्य पी.बी. पाटील सोशल फोरमचे सचिव बी. आर. थोरात यांनी पत्रकार बैठकीत दिली.
ज्येष्ठ विचारवंत, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या ९२ व्या जयंती निमित्ताने यंदाही १४ ते १८ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कोषाध्यक्ष गौतम पाटील उपस्थित होते.
थोरात यांनी सांगितले की, रविवारी सकाळी दहा वाजता माजी विद्यार्थी मेळावा व गुणवंत माजी विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमही होईल. यावर्षीचा गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार रोपवाटिका उद्योजक विश्वास यशवंत पाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे. १२ ते १६ जानेवारी दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
१४ ते १७ जानेवारीअखेर रांगोळी स्पर्धा, विविध कलात्मक वस्तूंचे भव्य कला प्रदर्शन, १५ रोजी एकतारी भजन स्पर्धा, १६रोजी ग्रुप डान्स स्पर्धा, १७ रोजी लावणी तर १८ रोजी लेझीम स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन बी.आर.थोरात आणि कोषाध्यक्ष गौतम पाटील यांनी केले आहे.