जतमध्ये संचारबंदी आदेशाला केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:28 AM2021-05-27T04:28:34+5:302021-05-27T04:28:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संख : कोरोनामुळे संचारबंदी लागू असतानाही जत शहरात आदेश पायदळी तुडविला जात आहे. जत शहरासह परिसरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : कोरोनामुळे संचारबंदी लागू असतानाही जत शहरात आदेश पायदळी तुडविला जात आहे. जत शहरासह परिसरात रस्त्यांवर गर्दी दिसत आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
तालुक्यातील ३१ गावे कोरोना ‘हाॅटस्पाॅट’ आहेत. जत पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी कोरोना रोखण्यासाठी कठोर कारवाई हाती घेतली होती; परंतु सध्या पोलीस प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना दिसत नाही. पोलीस फक्त चौकात उभे असलेले दिसतात पण कारवाई होताना दिसत नाही.
जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहने फिरताना दिसत आहेत. किराणा दुकाने, चिकन, मटण दुकाने, कपड्याची दुकाने, ज्वेलर्स दुकाने शटर बंद करून मागून सुरू असल्याचे दिसून येत आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय इतरांना पेट्रोल न देण्याचे आदेश दिले असतानाही मोठ्या प्रमाणात लोक पेट्रोल खरेदी करण्यासाठी पंपांवर गर्दी करत आहेत.
जत नगरपरिषद, पोलीस प्रशासन व तालुका प्रशासन यांच्याकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष होत असल्यानेच जत शहरासह तालुक्यात कोरोना वाढत चालला आहे.