Sangli: कृष्णा नदीतील उपसा बंदी शिथिल, शेतीचा पाणीपुरवठा सुरु; पिण्याच्या पाण्याचा आठवड्याचा प्रश्न सुटला

By अशोक डोंबाळे | Published: June 19, 2023 12:36 PM2023-06-19T12:36:53+5:302023-06-19T12:37:20+5:30

सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी विद्युतपुरवठा पूर्ववत करण्याच्या महावितरणला दिल्या सूचना

Ban on pumping in Krishna river relaxed, water supply to agriculture resumed | Sangli: कृष्णा नदीतील उपसा बंदी शिथिल, शेतीचा पाणीपुरवठा सुरु; पिण्याच्या पाण्याचा आठवड्याचा प्रश्न सुटला

Sangli: कृष्णा नदीतील उपसा बंदी शिथिल, शेतीचा पाणीपुरवठा सुरु; पिण्याच्या पाण्याचा आठवड्याचा प्रश्न सुटला

googlenewsNext

सांगली : कोयना धरणात पाणीसाठा कमी असल्यामुळे कृष्णा नदीवरील शेतीच्या सर्व पाणी योजनांसाठी दि. १४ ते १९ जूनपर्यंत उपसाबंदी आदेश पाटबंधारे विभागाने लागू केला होता. पण, सध्या कोयना धरणातील सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णा नदीत पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे दि. १९ जूनपासून कृष्णा नदीतील उपसा बंदी पूर्ण शिथिल केली आहे. या योजनांचा विद्युत प्रवाह पूर्ववत करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली.

कोयना धरणात ११.५३ टीएमसी, तर वारणा (चांदोली) धरणात ११.१८ टीएमसी पाणीसाठा असून, तो पुरवणे अत्यावश्यक आहे. धरणातील पाणीसाठ्याचा विचार करून कृष्णा नदीतून दि. १४ ते १७ जून या चार दिवसांसाठी उपसाबंदी आदेश लागू केला होता. कृष्णा नदीतील साटपेवाडी बंधाऱ्यावर ताकारी सिंचन योजनेसाठी पाणीसाठा केला होता. ती योजना बंद केल्यामुळे साटपेवाडी बंधाऱ्यातून पाणी सोडून तीन दिवस झाले तरीही ते पाणी कृष्णा नदीतून सांगलीपर्यंत येऊ शकले नाही. म्हणून अधिकाऱ्यांनी दि. १९ जूनपर्यंत उपसाबंदी आदेश वाढविला होता. 

अखेर कोयना धरण आणि साटपेवाडी बंधाऱ्यातून सोडलेले कृष्णा नदीतील पाणी सांगलीत आले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा आठवड्याचा प्रश्न सुटला आहे. म्हणून कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी कृष्णा नदीतील शेतीच्या सर्व पाणी योजनांसाठी उपसाबंदी आदेश उठविला आहे. महावितरणला वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Ban on pumping in Krishna river relaxed, water supply to agriculture resumed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.