Sangli: ‘स्वाभिमानी’च्या दणक्याने उपसाबंदी आदेश मागे, उद्यापासून कृष्णा नदीतून पाणी उपसा
By अशोक डोंबाळे | Published: June 24, 2023 05:25 PM2023-06-24T17:25:26+5:302023-06-24T17:30:12+5:30
सांगलीत पाटबंधारे कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन
सांगली : कोयना धरणात १० टक्के पाणीसाठा असल्यामुळे पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सोमवार दि. २६ जूनपर्यंत उपसा बंदी आदेश दिला होता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पिके वाळू लागल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी सांगलीत पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन केले. तसेच अधिकाऱ्यांना यापुढे असा मनमानी कारभार खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कृष्णा नदीतीलपाणी उपसा बंदी आदेश रविवार दि. २५ जूनपासून मागे घेतला आहे.
सांगली येथील पाटबंधारे कार्यालयासमोर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शनिवारी शंखध्वनी आंदोलन केले. कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मारला होता. अधिकारी आणि सरकारच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. उपसाबंदी मागे घेतली नाही तर पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.
शेवटी राजू शेट्टी यांनी जलसंपदाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांच्याशी मोबाइलवरून चर्चा करून तोडगा काढला. यावेळी उपविभागीय अभयिंता मोहन गळंगे उपस्थित होते. त्यानंतर कार्यकारी अभियंत्या ज्योती देवकर यांनी उपसाबंदी आदेश मागे घेत असल्याचे पत्र आंदोलकांना दिले. कृष्णा नदीतून रविवार दि. २५ जूनपासून पाणी उपसा चालू होणार आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही कृष्णा नदीकाठच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेशही देवकर यांनी दिले आहेत. या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
आंदोलनात महेश खराडे, भागवत जाधव, पोपट मोरे, संदीप राजोबा, प्रकाश देसाई, तानाजी साठे, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी, शिवाजी पाटील, शंकर पाटील, उत्तम पाटील, योगेश पाटील, यशवंत गायकवाड, दिगंबर देसाई, अशोक काकडे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
साताऱ्यात पाणी उपसा, सांगलीतच बंदी का? : राजू शेट्टी
पाण्याची टंचाई आहे, याची जाणीव आम्हाला आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात उपसाबंदी आणि सातारा जिल्ह्यात उपसा सुरू आहे, हा दुजाभाव नको, सरसकट सर्वांना एकच नियम लागू करण्याची गरज आहे. सांगली जिल्ह्याला एक न्याय आणि सातारा जिल्ह्याला एक न्याय हे खपवून घेणार नाही. प्रशासनाने भेदभावाचे धोरण राबविल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.