सांगली प्रदूषण नियंत्रण मंडळाला टाळे ठोकू; पृथ्वीराज पवार, सतीश साखळकरांचा इशारा
By शीतल पाटील | Published: April 5, 2023 07:32 PM2023-04-05T19:32:45+5:302023-04-05T19:33:13+5:30
'कृष्णा नदीत थेट पाणी सोडणारे साखर कारखाने, डिस्टिलरी, दूध संघ, नगरपालिका, ग्रामपंचायती, महापालिका सगळे दोषी आहेत. हरित लवादाच्या अहवालानुसार कारवाई अपेक्षित'
सांगली : प्रदूषण नियंत्रण मंडळ राजकीय दबावाखाली काम करणार असेल तर कृष्णा नदीचेप्रदूषण रोखणे अशक्य आहे. नदी प्रदूषणाला जबाबदार घटकांवर कार्यवाही सुरू करा. केवळ कागदी घोडे नाचवायचे असतील तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकावे लागेल, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार आणि नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी बुधवारी दिला.
कृष्णा नदी प्रदूषणाबाबत उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, आनंद देसाई उपस्थित होते.
सांगलीकर रस्त्यावर उतरले, हजारो लोकांनी मानवी साखळी केली. त्यानंतरही केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरू आहे. नदी प्रदूषणावर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आणि महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्याशी स्वतंत्र बैठक घेऊन सोक्षमोक्ष लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पृथ्वीराज पवार म्हणाले, कृष्णा नदीत थेट पाणी सोडणारे साखर कारखाने, डिस्टिलरी, दूध संघ, नगरपालिका, ग्रामपंचायती, महापालिका सगळे दोषी आहेत. हरित लवादाच्या अहवालानुसार कारवाई अपेक्षित आहे. राजकीय दबावातून कृष्णा नदीची वाट लागत आहे. कारवाईत हलगर्जीपणा नको; अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय बंद करावे लागेल.
सतीश साखळकर म्हणाले, नदी प्रदूषणावर विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी झाली. हरित लवाद समितीचा अहवाल पटलावर ठेवला. मंत्रालयात बैठका झाल्या; मात्र कृती कार्यक्रम नेमका काय, याचे उत्तर कोणत्याच यंत्रणेकडे नाही. ज्या संस्था चोरून नदीत सांडपाणी सोडत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करा. शहरे व गावांतील सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी आम्ही दबाव वाढवू, प्रसंगी मोठे आंदोलन उभे करू.
कायदेशीर कारवाई सुरू
नदी प्रदूषणाबाबत सरकार गंभीर असून, लवकरच मार्गदर्शक सूचना हाती येतील. प्रदूषण करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. जे दोषी सापडतील त्यांचे अहवाल आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करीत आहोत, त्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे, असे अवताडे यांनी स्पष्ट केले.