बंडोबांच्या थंडोबासाठी नेत्यांची झाली दमछाक

By Admin | Published: October 1, 2014 10:55 PM2014-10-01T22:55:34+5:302014-10-02T00:13:53+5:30

विधानसभा निवडणूक : जत, सांगली, मिरज, पलूस-कडेगावसाठी वेगवान घडामोडी

Bandhoba's thug | बंडोबांच्या थंडोबासाठी नेत्यांची झाली दमछाक

बंडोबांच्या थंडोबासाठी नेत्यांची झाली दमछाक

Next

सांगली : अधिकृत उमेदवारांना डोकेदुखी ठरू पाहणाऱ्या जिल्ह्यातील बंडखोरांना थंड करण्यासाठी आज (बुधवारी) काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना मोठी कसरत करावी लागली. बंडखोरांचे अर्ज मागे घेण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. बहुतांश बंडोबा थंड झाले असले तरी, सांगली, पलूस-कडेगाव आणि मिरज मतदारसंघातील बंडखोरांची डोकेदुखी कायम राहिली आहे.
काँग्रेसला जिल्ह्यात सांगली, मिरज आणि जतमध्ये उभारलेल्या बंडखोरांची अडचण होती. या सर्वांना शांत करण्यासाठी मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दुपारपर्यंत नेत्यांची कसरत सुरू होती. माजी वनमंत्री पतंगराव कदम सांगलीत बुधवारी दुपारपर्यंत तळ ठोकून होते. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील व मदन पाटील यांनीही बंडखोरांबाबत वेगवान हालचाली केल्या. जतमधील अधिकृत उमेदवाराला डोकेदुखी ठरू पाहणाऱ्या बंडखोरांना शांत करण्यात मदन पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तेथे सुरेश शिंदे, प्रकाश जमदाडे यांची बंडखोरी रोखण्यात नेत्यांना यश आले. तेथील काँग्रेसअंतर्गत बंडखोरी थांबविण्याची जबाबदारी कदम यांनी मदन पाटील यांच्यावर सोपविली होती. जतमध्ये राष्ट्रवादीलाही प्रभाकर जाधव यांच्या अर्जाची चिंता लागली होती. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील व माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी मध्यस्थी करून त्यांना थांबविले.
काँग्रेस नेत्यांना सांगलीतील बंडखोरीची सर्वाधिक चिंता होती. मुन्ना कुरणे आणि दिगंबर जाधव यांना थांबविण्यासाठी प्रयत्न चालू होते. पतंगराव कदम, मदन पाटील, प्रतीक पाटील यांनी प्रयत्न केले, पण यश मिळाले नाही. सायंकाळी कुरणे यांनी पत्रकार परिषद घेऊन, उमेदवारी मागे घेण्यासाठी नेत्यांच्या आलेल्या दबावाचा उल्लेखही केला.
मिरजेतील सी. आर. सांगलीकरांची बंडखोरी रोखण्यासाठी काँग्रेसचे सर्वच नेते प्रयत्नशील होते. मंगळवारी दुपारपासून यासाठी प्रयत्न सुरू होते. बुधवारी सकाळी कॉँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ जाधव यांनी पतंगरावांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तेथूनही हालचाली झाल्या.
सांगलीकरांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी बुधवारी दुपारपर्यंत जोरदार राजकीय घडामोडी झाल्या. शेवटी सांगलीकरांनी बंडखोरीचा झेंडा फडकविलाच. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि आर. आर. पाटील यांनी बंडोबांना शांत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. सांगलीतून दिनकर पाटील यांच्या अर्जाची चिंता त्यांना होती. जयंतरावांनी दिनकर पाटील यांच्याशी मंगळवारी दुपारपासून सातत्याने दूरध्वनीवरून संपर्क ठेवला होता. बुधवारी सकाळी दिनकर पाटील यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.
सांगलीत शिवाजी डोंगरे यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून भाजपनेही प्रयत्न चालविले होते. खासदार संजय पाटील यांनी मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी डोंगरे यांच्याशी चर्चा केली. स्टेशन चौकातील डोंगरे यांच्या कार्यालयात बुधवारी सकाळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. भाजप नेत्यांनी विनंती केली असली तरी, अर्ज मागे घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांचा दबावही त्यांच्यावर आला होता. तरीही भाजप नेत्यांच्या प्रयत्नानंतर अखेर डोंगरे यांनी माघार घेतली. (प्रतिनिधी)
बंडखोरीमागे संशयाचे भूत
प्रत्येक बंडखोरामागे कोणत्या ना कोणत्या नेत्याचा हात असल्याचा संशय आज राजकीय वर्तुळात व्यक्त होत होता. त्यामुळे यातील अनेक नेत्यांना आपल्यामागे कुणीही नसल्याचे वारंवार सांगावे लागत होते. कुरणे यांच्यामागे भाजप किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हात आहे का?, अशी शंका उपस्थित होत होती. जाधव, मिरजेचे सांगलीकर यांच्याबाबतही अशीच शंका व्यक्त होत आहे.
इद्रिस नायकवडी, हरिदास पाटील यांनीही अर्ज मागे घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सुरेश पाटील यांच्यासमोरील संभाव्य बंडखोरीची अडचण आता दूर झाली आहे.

Web Title: Bandhoba's thug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.