रक्तचंदनाच्या आंतरराज्य तस्करीत बंगळुरुची टोळी, दोन कोटीचे रक्तचंदन केले होते जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 01:25 PM2022-02-02T13:25:13+5:302022-02-02T13:26:05+5:30

बंगळुरूमधून कोल्हापूरकडे होणारी रक्तचंदनाची तस्करी गांधी चौक पोलिसांनी मिरज-कोल्हापूर रस्त्यावर उघडकीस आणली.

Bangalore gang involved in interstate smuggling of sandalwood | रक्तचंदनाच्या आंतरराज्य तस्करीत बंगळुरुची टोळी, दोन कोटीचे रक्तचंदन केले होते जप्त

रक्तचंदनाच्या आंतरराज्य तस्करीत बंगळुरुची टोळी, दोन कोटीचे रक्तचंदन केले होते जप्त

googlenewsNext

मिरज : रक्तचंदन तस्करीच्या आंतरराज्य तस्करीत बंगळुरूचे कनेक्शन उघड झाल्यानंतर, या टोळीच्या शाहबाज नामक म्हाेरक्याच्या शोधासाठी गांधी चौकी पोलिसांचे पथक बंगळुरूला रवाना झाले. या तस्करीमध्ये महाराष्ट्र, कर्नाटकातील काही चंदनतस्कर जाळ्यात सापडण्याची शक्यता आहे. रक्तचंदन तस्करी उजेडात आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी गांधी चौक पोलिसांना प्रमाणपत्र देऊन शाबासकी दिली.

याप्रकरणी अटकेतील यासिन इनायतुल्ला खान यास न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. बंगळुरूमधून कोल्हापूरकडे होणारी रक्तचंदनाची तस्करी गांधी चौक पोलिसांनी सोमवारी मिरज-कोल्हापूर रस्त्यावर उघडकीस आणली. बंगळुरूमधील टेम्पो पकडून सुमारे दोन कोटी ४५ लाखाचे रक्तचंदन जप्त केले. सध्या गाजणाऱ्या पुष्पा चित्रपटाप्रमाणे रक्तचंदन तस्करी उघडकीस आल्याने यात पुष्पा चित्रपटाप्रमाणेच मोठी टोळी असल्याचा संशय आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला टेम्पोचालक यासिन इनायतुल्ला खान याने चंदन हे बंगळुरूमधील शाहबाज नामक व्यक्तीने दिल्याचे सांगितले आहे. यामुळे पोलीस कोल्हापूर ते बंगळुरू कनेक्शनचा शोध घेण्यासाठी मंगळवारी गांधी चौकी पोलिसांचे पथक बंगळुरूला रवाना झाले. बंगळुरूमधील शाहबाज नामक टोळीप्रमुख ताब्यात आल्यानंतर रक्तचंदन तस्कर टोळी उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू असल्याचे सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितले.

बेंगळुरूतून आलेले रक्तचंदन कोल्हापूर जिल्ह्यात कुणाकडे जाणार होते? कोल्हापुरातील ‘पुष्पा’ कोण? सांगली-मिरजेतील कोणाचा यात सहभाग आहे का? याचाही पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस अधीक्षकांची शाबासकी

रक्तचंदन तस्करी उघडकीस आणल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी गांधी चौक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह त्यांच्या पथकाला प्रमाणपत्र देऊन शाबासकी दिली.

Web Title: Bangalore gang involved in interstate smuggling of sandalwood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.