कोरोना रुग्णांसह कर्मचाऱ्यांना दररोज अंडी पुरवतोय बँक अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:26 AM2021-05-18T04:26:41+5:302021-05-18T04:26:41+5:30

विकास शहा /लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : कासेगाव (ता.वाळवा) येथील व्यावसायिक आणि बँक अधिकारी शिराळ्याच्या उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसह ...

Bank officials providing eggs daily to employees, including Corona patients | कोरोना रुग्णांसह कर्मचाऱ्यांना दररोज अंडी पुरवतोय बँक अधिकारी

कोरोना रुग्णांसह कर्मचाऱ्यांना दररोज अंडी पुरवतोय बँक अधिकारी

Next

विकास शहा /लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : कासेगाव (ता.वाळवा) येथील व्यावसायिक आणि बँक अधिकारी शिराळ्याच्या उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसह कर्मचाऱ्यांना दररोज शंभर अंडी पुरवत आहे. अशोक माने हे त्यांचे नाव. ते जिल्हा बँकेत तालुका विभागीय अधिकारी असून, मागील महिन्यापासून रुग्णांना शंभर अंडी शिजवून देत आहेत.

पैसे असूनही आईला कोरोनामधून वाचवू शकलो नाही. तसे दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये, म्हणून आईच्या स्मरणार्थ माने यांनी हे कार्य सुरू केले आहे. उपजिल्हा रुग्णालयातील शिपाई आनंदा कांबळे रोज सकाळी नऊ वाजता न चुकता शिजवलेली अंडी रुग्णांना देतात. नातेवाइकांनी कांबळे यांच्याकडे अंडी कोण देते, याची विचारणा केली असता, त्यांनी अंडी देणाऱ्याचे नाव माहीत नसल्याचे सांगितले. यामुळे त्या अवलियाच्या शोधात रुग्णांचे नातेवाईक होते.

जाहिरातबाजी न करता हे सत्कार्य सुरू आहे. त्या दात्याचा शोध घेतला असता, ते कासेगाव येथील व्यावसायिक व शिराळा येथील जिल्हा बँकेत विभागीय अधिकारी अशोक माने असल्याचे समजले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये सातारा येथील रुग्णालयात माने यांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. पैसा असूनही आईला वाचविता आले नाही, हे दुःख जिव्हारी लागल्याने आईच्या स्मरणार्थ ते रोज शिराळा येथे बँकेत कामावर येताना घरातून अंडी शिजवून आणतात. कोरोनाचे संकट असेल, तोपर्यंत रोज अंडी पुरवणार असल्याचे त्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

त्यांनी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना भाजीपाला दिला होता. रुग्णांना ते आर्थिक स्वरूपातही मदत देत असतात.

Web Title: Bank officials providing eggs daily to employees, including Corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.