लूट रोखण्याची जबाबदारी बँकांचीही!

By admin | Published: February 10, 2017 10:44 PM2017-02-10T22:44:55+5:302017-02-10T22:44:55+5:30

दीपाली काळे : ‘सीसीटीव्ही’सह रखवालदार नियुक्तीच्या आदेशाला कोलदांडा

Banks have the responsibility to loot! | लूट रोखण्याची जबाबदारी बँकांचीही!

लूट रोखण्याची जबाबदारी बँकांचीही!

Next



प्रश्न : बँकांची रक्कम भरदिवसा लुटली जात असल्याने, याची जबाबदारी कोणाची?
उत्तर : बँक, पोस्ट कार्यालय, एटीएम या तीन ठिकाणी प्रामुख्याने ग्राहकांवर ‘वॉच’ ठेवून त्यांच्याकडील रक्कम लुटली जात आहे. या लुटीला संबंधित ग्राहक, बँक, पोस्ट व पोलिस हे चारही घटक जबाबदार आहेत. विशेषत: बँकांची खूप मोठी जबाबदारी आहे. घडलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यास पोलिस समर्थ आहेत. मात्र बँका व ग्राहकांनीही सुरक्षिततेच्यादृष्टीने सतर्क राहिले पाहिजे.
प्रश्न : बँकांनी काय करायला हवे?
उत्तर : ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहावेत, यासाठी बँकेबाहेर, परिसरात व पार्किंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. बँकेत रखवालदाराची नियुक्ती आहे. पण बँकेच्या परिसरात आणखी एका रखवालदाराची नेमणूक केली पाहिजे. जेणेकरुन हा रखवालदार बँकेत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली टिपू शकेल. याशिवाय बँकेत ग्राहकांमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. चोरटे हे नेहमी ‘रेकी’ करुनच ग्राहकांना लुटतात. एखादी स्लिप घेऊन ती भरण्याचे ते नाटक करतात. मात्र त्यांचे सर्व लक्ष ग्राहकांकडे असते. चोरटे दिवसातून अनेकदा बँकेत जातात. ही बाब रखवालदार व कर्मचाऱ्याच्या लक्षात आली, तर संशयित चोरट्यास पकडता येऊ शकते. त्यामुळे पुढील गुन्ह्यांना आळा बसविण्यात यश मिळेल. बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना हे उपाय सुचविले आहेत. तरीही त्यांनी याची अंमलबजावणी केलेली नाही. एटीएममध्ये पैसे भरण्यास खासगी कंपन्यांना ठेका दिला जातो. हे ठेकेदार स्थानिक लोकांची नियुक्ती करुन त्यांना पैसे भरण्याचे काम देतात. दररोज लाखो रुपये त्यांच्याकडे दिले जातात. हे खासगी कर्मचारी पैसे भरताना कोणतीही काळजी घेत नाहीत. परिणामी मिरजेसारखी घटना घडते. पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला आहे. यासाठी आता बँकेने एटीएममध्ये पैसे भरण्याची स्वत:चीच यंत्रणा उभी केली पाहिजे.
प्रश्न : पोलिस यंत्रणा लुटीच्या गुन्ह्याचा तपास कसा करते?
उत्तर : ठराविक बँकांच्या परिसरातच ग्राहकांना लुटले जात आहे. या बँकांबाहेर वेशातील पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच अशी एखादी घटना घडली, तर गस्ती पथक अवघ्या सात मिनिटात घटनास्थळी दाखल होते. चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने नाकाबंदी केली जाते. बँकेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास केला जातो. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी केली जाते. बँकेच्या रखवालदाराकडे चौकशी केली जाते. अशाप्रकारे घडलेल्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना निश्चित यश येईल, असे वाटते. गेल्या तीन महिन्यात ‘चेनस्नॅचिंग’च्या अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले आहे.
प्रश्न : ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
उत्तर : बँकेतून दहा हजाराची रक्कम काढायची असली तरी ग्राहकांनी काळजी घ्यावी. मोठी रक्कम काढायची असेल तर त्यांनी सोबत कुणाला तरी घ्यावे. रक्कम ठेवण्यासाठी बॅग घ्यावी. बँकेत एखादी व्यक्ती संशयाने पाहत असल्याचे दिसून आले, तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. आपला कोणी तरी पाठलाग करीत असल्यास, ते लक्षात आले पाहिजे.

- सचिन लाड, सांगली

Web Title: Banks have the responsibility to loot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.