Sangli: शिराळ्यातील नागपंचमीसाठी केदारनाथमध्ये बॅनर झळकले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 04:15 PM2023-07-01T16:15:26+5:302023-07-01T16:15:59+5:30
भाविकांनी बॅनर पाहून कुतूहलाने नागपंचमीबाबत माहिती विचारली
विकास शहा
शिराळा : शिराळा येथे पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी झाली पाहिजे या मागणीसाठी केदारनाथ येथे शिराळ्यातील नागरिकांनी बॅनर फडकावले. ‘शिराळ्याची नागपंचमी झालीच पाहिजे’ अशा आशयाचा हा बॅनर अनेकांचे लक्ष वेधून घेत होता.
शिराळा आणि नागपंचमी याचे अतूट नाते आहे. ते कोणीही तोडू शकत नाही. काही दिवसांपूर्वी माजी सभापती ॲड. भगतसिंग नाईक यांनी ‘शिराळ्याची नागपंचमी झालीच पाहिजे’ हे बॅनर मुंबई येथे वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावेळी फडकावले होते. आता शिराळा येथील डॉ. चंद्रकांत पाटील यांनी असेच बॅनर केदारनाथमध्ये फडकावून नागपंचमीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे.
डॉ. पाटील, मनोहर यादव मित्रांसोबत केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले होते. तेथे त्यांनी ‘शिराळ्याची नागपंचमी झालीच पाहिजे’ हे बॅनर फडकावले. भाविकांनी बॅनर पाहून कुतूहलाने नागपंचमीबाबत माहिती विचारली; तर काहींनी ही नागपंचमी पाहिल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.