बाप्पांचे परदेशगमन यावर्षीदेखील नाहीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 12:58 PM2021-07-12T12:58:46+5:302021-07-12T14:13:10+5:30
Ganeshotsav Sangli : कोरोना व लॉकडाऊनमुळे बाप्पांचे परदेशगमन यंदाही होणार नाही. सांगलीतून दरवर्षी दीड हजार मूर्ती अमेरीकेसह युरोपीय देशांत जातात, त्यांची निर्यात लॉकडाऊनमुळे झालेली नाही.
संतोष भिसे
सांगली : कोरोना व लॉकडाऊनमुळे बाप्पांचे परदेशगमन यंदाही होणार नाही. सांगलीतून दरवर्षी दीड हजार मूर्ती अमेरीकेसह युरोपीय देशांत जातात, त्यांची निर्यात लॉकडाऊनमुळे झालेली नाही.
गेल्यावर्षी मार्चपासूनच लॉकडाऊन सुरु झाल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला होता. यावर्षीही दुसरी लाट कायम असल्याने गणेशोत्सवाच्या जल्लोषावर निर्बंध जाहीर झाले आहेत. हजारो सांगलीकर व्यवसाय-नोकरीच्या निमित्ताने जगभर विखुरले आहेत.
देश सोडला तरी त्यांनी मराठी संस्कृती जपली आहे. गणेशोत्सवासाठी गावाकडूनच मूर्तीची परंपरा वर्षानुवर्षे सांभाळली आहे. सांगलीतून दरवर्षी सुमारे दीड हजार मूर्ती परदेशी जातात. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, चीन, श्रीलंका, आफ्रीकन देशांत पाठवल्या जातात. प्रवासाला लागणारा प्रदीर्घ वेळ पाहता ऑगस्ट-सप्टेंबरच्या उत्सवासाठी मे, जून महिन्यातच बाप्पांचे प्रयाण होते.
यंदा लॉकडाऊनमुळे बहुतांश देशांनी परदेशी वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे जलवाहतूक बंद आहे. परिणामी बाप्पांना परदेशी जाता आलेले नाही. मूर्तीकारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परदेशस्थ मराठी जनांनाही गावाकडच्या बाप्पांच्या मूर्तीची आराधना करता येणार नाही. धातूची मूर्ती किंवा प्रतिमेसमोरच गणरायाची वंदना करावी लागेल.
उत्सवावरील निर्बंध पाहता स्थानिक भक्तांसाठीही मर्यादीत संख्येने मूर्ती तयार करण्यात येत आहेत. मंडळांच्या मूर्तीदेखील कमी उंचीच्या व कोणतीही सजावट नसलेल्या आहेत.
प्रदूषण टाळण्यासाठी शाडूच्या मूर्ती
परदेशात प्रदुषणाचे निर्बंध अत्यंत कडक असल्याने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती टाळल्या जातात. पूर्णत: शाडूच्या व प्रदूषणविरहीत रंगाने रंगवलेल्या मूर्ती पाठवल्या जातात. विमानाने निर्यात केली जात नाही. ही वाहतूक खर्चिक आहे, शिवाय मूर्तींची हाताळणीही बेजबाबदारपणे होते. परदेशात पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या मोडतोडीची भिती असते, त्यामुळे जलवाहतुकीमार्गे पाठवल्या जातात.
लॉकडाऊनमुळे यंदा गणेशमूर्ती परदेशात पाठवता आलेल्या नाहीत. दरवर्षी मे-जून महिन्यातच जहाजातून निर्यात केली जाते. पण यावर्षी बाप्पा परदेशी जाऊ शकले नाहीत. यामुळे परदेशस्थ मराठीजनांचा विरस झाला आहे.
- हरिहर म्हैसकर,
मूर्तीकार, सांगली.