बापू, भाऊ जिल्ह्यात कधी येणार हो..?
By admin | Published: March 2, 2017 11:45 PM2017-03-02T23:45:16+5:302017-03-02T23:45:16+5:30
पालकमंत्री म्हंजी काय.. : पक्षवाढीसाठी प्रयत्न नाहीतच; शिवसैनिकांची तर जाहीर नाराजी, निवडणुकीतही फारसे हाती नाही
नितीन काळेल ल्ल सातारा
पालकमंत्र्यांनी किमान १५ दिवसांतून एकदा तरी जिल्ह्यात येऊन आढावा घेणे अपेक्षित असते. मात्र, जिल्ह्याला पालकमंत्री आणि सहपालकमंत्री असे दोघेजण असतानाही त्यांचे दुर्लक्ष होत होत आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याबद्दल तर शिवसेना कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. तर सदाभाऊ खोत हे सहपालकमंत्री झाल्यापासून क्वचितच फिरकले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पालकमंत्री कधी येणार अशी विचारणा करावी लागत आहे. तर आताच्या निवडणुकीतही शिवसेनेच्या हाती तसे फारसे काहीच लागलेले नाही.
प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या विकासाचा गाडा हाकला जातो. सातारा जिल्ह्याचा विचार करता आतापर्यंत बाहेरील जिल्ह्यातीलही अनेक लोकप्रतिनिधी साताऱ्याचे पालकमंत्री झाले आहेत. यामध्ये अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातीलही रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे यांनी पालकमंत्रिपद सांभाळले होते. आता तर पुणे जिल्ह्यातील असणारे विजय शिवतारे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेल्या सुमारे अडीच वर्षांपासून त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आहे. तर गेल्या दोन महिन्यांपासून सांगलीचे असणारे व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे जिल्ह्याची सहपालकमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. यामधील शिवतारे यांच्याबद्दल लोकांच्या तसेच खुद्द शिवसैनिकांच्याही तीव्र भावना आहेत. पालकमंत्री वेळ देत नाहीत, कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. जिल्ह्यात आले तरी एक-दोन ठिकाणी भेटी द्यायच्या, अधिकाऱ्यांना कोठेतरी बोलवून घेऊन कामाच्या सूचना करायच्या याच्या पलीकडे ते काहीच करीत नाहीत, अशाच कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. याबद्दल शिवसेनेच्या बैठकीत अनेकवेळा चर्वितचर्वण झाले आहे. मात्र, त्यानंतरही काहीही फरक पडलेला नाही.
आता तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली. त्यावेळी अपवाद वगळता पालकमंत्री कोठेही प्रचारात दिसून आले नाहीत. त्यामुळे शिवसैनिकांनी लढायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शिवसेनेला यश मिळाले नसल्यासारखेच झाले आहे. परिणामी जिल्ह्यात शिवसेनेची अवस्था सेनापतीविना सैन्य अशीच काहीसी झाली आहे.
खंडाळा तालुक्यात तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उभे होते. तसेच गट, गणातही उमेदवार उभे होते. मात्र, पक्षाला यश मिळाले नाही. खंडाळ्यामधील निवडणुकीसाठी त्यांनी वेळ दिला नाही, असेच शिवसैनिक सांगत आहेत. त्यामुळे शिवसेना उमेदवारांनी कोणाच्या भरवशावर निवडणूक लढायची हा प्रश्न होता. अशीच स्थिती कमी अधिक फरकाने इतर तालुक्यांतही दिसून आली.
दोन महिन्यांपूर्वी सदाभाऊ खोत हे सहपालकमंत्री झाले. सुरुवातीला त्यांनी एक दौरा करून माहिती घेतली. त्यानंतर एकदा-दोनदा त्यांचा दौरा झाला. त्यानंतर मात्र, ते कोठेही फारसे दिसून आले नाहीत. निवडणुकीच्या निमित्ताने फलटणला आले होते. त्यांच्या पक्षाचे अनेक ठिकाणी उमेदवार उभे होते. त्यांच्या प्रचारासाठीही सदाभाऊ खोत यांनी फारसे लक्ष घातले नाही.
सदाभाऊ खोत यांनी संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठे जाळे विणले आहे. माण, खटाव, कोरेगाव, फलटण या तालुक्यांत संघटनेचे अस्तित्व आहे. त्याचबरोबर २०१४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी माढा मतदार संघातून लढविली होती. त्यावेळी अवघ्या काही हजारांच्या मताने त्यांना पराभव पत्करावा लागला होता. सदाभाऊंचे कार्य असल्याने त्यांच्याकडून दुष्काळी तालुक्यांच्या अपेक्षा आहेत; पण त्यासाठी सदाभाऊंना वेळ मिळत
नसल्याचे दिसून येत आहे. दोन पालकमंत्री असलेतरी त्यांच्याकडून लोकांच्या व कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत.