कोरोनाला वाकुल्या दाखवत सहा हजार लग्नांचा बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:25 AM2021-04-25T04:25:46+5:302021-04-25T04:25:46+5:30
सांगली : कोरोनाला ठेंगा दाखवित जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सुमारे दोन हजार लग्नांचा बार जिल्ह्यात उडाला. महापालिका क्षेत्रातील सुमारे दोन ...
सांगली : कोरोनाला ठेंगा दाखवित जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सुमारे दोन हजार लग्नांचा बार जिल्ह्यात उडाला. महापालिका क्षेत्रातील सुमारे दोन हजार लग्नांचा यात समावेश. नोंदणी पद्धतीने लग्न करणाऱ्यांचे प्रमाण केवळ १५ टक्के इतकेच आहे. जिल्ह्यातील कार्यालयांमध्ये सुमारे ४५ टक्के, तर ४० टक्के विवाह हे वधु-वराच्या दारात, मंदिरात किंवा शेतात लावले गेले आहेत.
जिल्ह्यात सध्या सुमारे ३५० मंगल कार्यालये आहेत. दरवर्षी सरासरी प्रत्येक मोठ्या मंगल कार्यालयात ३० ते ४० विवाह होतात. कोरोनामुळे ही संख्या निम्म्यावर आली आहे. मार्च २०१९ पासून कोरोनामुळे विवाह कार्यांना विघ्न आले. एप्रिलपासून सप्टेेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाल्याने जाहीर विवाहांना ब्रेक लागला. तरीही या काळातही नियमांना बांधिल राहुल मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पडले. पास घेऊन वऱ्हाडी येत होते. ऑक्टोबर २०१९ पासून जेव्हा कोरोनाचा कहर कमी होत गेल्या तेव्हापासून लांबणीवर टाकलेली सर्व लग्ने धुमधडाक्यात मंगल कार्यालयांमध्ये होऊ लागली. कधी मुहूर्तावर तर कधी केवळ शुभ दिवस पाहून लग्नसोहळे पार पडले. मार्च २०२१ पर्यंत म्हणजेच गेल्या वर्षभरात सहा हजार लग्नांचा बार जिल्ह्यात उडाला. काेरोनापूर्वी दरवर्षी जिल्ह्यात सरासरी ८ ते ९ हजार लग्नसोहळे पार पडतात.
चौकट
गेल्या वर्षभरात मंगल कार्यालयांमध्ये फार कमी सोहळे पार पडले. कोरोना पूर्वीच्या वर्षाची तुलना केल्यास ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत लग्न सोहळ्यांचे प्रमाण घटले. मंगल कार्यालयांमध्ये नियम पाळले जात असल्याने शेतात, दारात किंवा मंदिरात लग्न करण्याचे प्रमाण या काळात वाढले. त्यामुळे मंगल कार्यालयांचे नुकसान झाले.
- संतोष भट, मंगल कार्यालयचालक
चाैकट
वर्षभरात ४९ मुहूर्त
गेल्या वर्षभरात हिंदू पंचागाप्रमाणे एकूण ४९ मुहूर्त होते. या मुहूर्ताांवर लग्नसोहळे पार पडले. याशिवाय जी लग्ने रद्द झाली, लांबणीवर गेली ती नंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर शुभमुहूर्त पाहून लग्नसोहळे पार पडले.
चौकट
एप्रिल महिनाही असाच जाणार
यंदा एप्रिल महिन्यात आता २४, २५, २६, २८,२९ व ३० तारखेला विवाह मुहूर्त आहेत. मे महिन्यात एकूण १६ विवाह मुहूर्त आहेत. तरीही सध्या सांगली जिल्ह्यातील निर्बंध कडक असून जिल्हाबंदी झाली आहे. त्यामुळे हे मुहूर्तही विवाहाविना निघून जाणार आहेत. या काळात मोजकीच लग्ने होण्याची शक्यता आहे. नियमानुसार विवाह करण्याचे सध्या बंधन आहे.