कर्जवसुलीच्या तगाद्याने बेडगला शेतकऱ्याची आत्महत्या लिलावाची धमकी : कुटुंबियांची बँकेविरुध्द पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 09:56 PM2018-09-04T21:56:05+5:302018-09-04T21:56:40+5:30
तालुक्यातील बेडग येथे थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेने लिलावाची नोटीस बजाविल्याने महादेव धोंडीबा नागरगोजे (वय ६२, रा. मंगसुळी रस्ता, बेडग) या शेतकºयाने पानमळ्यात गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी कर्ज वसुलीसाठी
मिरज : तालुक्यातील बेडग येथे थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेने लिलावाची नोटीस बजाविल्याने महादेव धोंडीबा नागरगोजे (वय ६२, रा. मंगसुळी रस्ता, बेडग) या शेतकऱ्याने पानमळ्यात गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी कर्ज वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बँकेविरुध्द नागरगोजे कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
महादेव नागरगोजे यांची मंगसुळी रस्त्यावर अडीच एकरात ऊस व पानमळ्याची शेती असून नागरगोजे यांनी चार वर्षापूर्वी गावातील एका राष्टÑीयीकृत बँकेतून दहा गुंठे पानमळ्यासाठी कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड झाली नसल्याने सुमारे दीड लाख रुपये कर्ज वसुलीसाठी बँकेने नागरगोजे यांना दोनवेळा नोटिसा बजावल्या होत्या. कर्जफेड झाली नाही तर जमिनीचा लिलाव करण्याचा इशारा बँकेच्या अधिकाºयांनी दिल्यामुळे, नागरगोजे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. सर्वांचे कर्ज माफ झाले, आपलेच का होत नाही, अशी विचारणा ते करीत होते. पानमळ्यातून येणारे उत्पन्नही अपुरे असल्याने कर्जफेडीच्या विवंचनेत ते होते.
मंगळवारी सकाळी महादेव नागरगोजे यांनी वैरण काढण्यासाठी जाताना, मुलगा आप्पा यांनाही शेतात येण्यास सांगितले. दरम्यान, महादेव नागरगोजे यांनी पानमळ्यात वापरण्यात येणाºया शिडीला तारेने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळ्याने पानमळ्यात पाने खुडण्यासाठी आलेल्या मजुरास नागरगोजे यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
महादेव नागरगोजे यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे बेडग गावात खळबळ उडाली असून, घटनास्थळी शेतकºयांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी महादेव नागरगोजे यांचा मुलगा आप्पा नागरगोजे यांनी ग्रामीण पोलिसात, बँकेच्या कर्जाच्या तगाद्यामुळे वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार केली आहे.