आयर्विनवरील बॅरिकेट्स नागरिकांनी हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:35 AM2021-02-27T04:35:09+5:302021-02-27T04:35:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आयर्विन पूल दुरुस्तीच्या कामासाठी महिनाभर बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे सांगलीवाडीतील नागरिकांचे प्रचंड हाल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आयर्विन पूल दुरुस्तीच्या कामासाठी महिनाभर बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे सांगलीवाडीतील नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने शुक्रवारी नगरसेवक अजिंक्य पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी दुचाकी व पादचाऱ्यासाठी पूल खुला करावा, अशी मागणी केली. मात्र, त्याला ठेकेदाराने नकार दिल्याने नागरिक व ठेकेदारांमध्ये जोरदार वादावादी झाली. अखेर संतप्त नागरिकांनी पूल बंदसाठी लावलेले बॅरिकेट्स तोडून दुचाकी व पादचारी वाहतूक सुरू केली.
आयर्विन पुलावरील फुटपाथला भगदाड पडू लागल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या बायपासमार्गे वाहतूक सुरू आहे; पण तिथेही वाहतुकीची कोंडी होत आहे. सांगलीवाडीतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच महिलांना बायपासमार्गे शहरात जावे लागत आहे. या सर्व प्रकाराला सांगलीवाडीतील नागरिक वैतागले. त्यांनी शुक्रवारी स्थायी समितीचे माजी सभापती अजिंक्य पाटील यांना घेऊन पुलावर धाव घेतली. अजिंक्य पाटील म्हणाले, पुलाचे काम करणे आवश्यक आहे. मात्र, हे काम करताना एका बाजूने काम करावे व दुसरी बाजू केवळ दुचाकीसाठी सुरू करावी, जेणेकरून बायपास पुलावर वाहतुकीचा ताण येणार नाही, अशी मागणी पाटील यांनी केली.
मात्र, नागरिकांची विनंती ठेकेदाराने ऐकून घेतली नाही. त्यांनी उद्धट उत्तरे दिली. त्यामुळे नागरिक आणि ठेकेदार यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी पुलावर असणारे बॅरिकेट्स हातोडीच्या साहाय्याने तोडून टाकत आयर्विन पूल दुचाकीच्या वाहतुकीसाठी खुला केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कोणतीच दाद देत नसल्याने सांगलीवाडीतील नागरिकांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
चौकट
दुचाकी वाहतूक सुरू ठेवा : पाटील
सांगलीवाडीहून सांगलीकडे ये-जा करण्यासाठी आयर्विन पूल सोयीस्कर आहे. मात्र, सध्याच्या दुरुस्तीमुळे वाहतूक बंद आहे. नागरिकांना बायपास पुलावरून जावे लागत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, महिलांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी आयर्विन पुलावरून पादचारी व दुचाकीसाठी तात्काळ प्रवेश खुला करून द्यावा, अशी मागणी नगरसेवक अजिंक्य पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.