आयफोनच्या बदल्यात परत दिल्या साबणाच्या वड्या, डिलीव्हरी बॉयची केली फसवणूक; सांगलीतील दोघांवर गुन्हा दाखल
By शरद जाधव | Published: April 8, 2023 05:39 PM2023-04-08T17:39:13+5:302023-04-08T17:39:37+5:30
काही दिवसांनी कंपनीकडे पार्सल पोहोचल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला
सांगली : आत्तापर्यंत ऑनलाईनव्दारे वस्तू मागविल्यानंतर वस्तूऐवजी विटा, साबणाच्या वड्या अथवा केवळ मोकळा बॉक्स देवून ग्राहकांची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे ऐकली असतील. मात्र, सांगलीवाडीत एका ग्राहकाने तीन आयफोन मागवून घेत त्यातील दोन आयफोन काढून घेत बॉक्समधून साबणाच्या वड्या देवून डिलीव्हरी बॉयचीच ८७ हजार १३६ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला.
याप्रकरणी श्रीकांत क्रांतीकुमार बेलवलकर (वय ३० रा. लक्ष्मीनगर, सांगली) यांनी रेहान अली खान (रा. संभाजीनगर, सांगलीवाडी) आणि एक अनोळखीविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित रेहान खान याने ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळावरून एक लाख ३२ हजार रुपये किमतीच्या तीन आयफोनची ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर देण्यासाठी फिर्यादी बेलवलकर पार्सल कंपनीकडे दि. १४ मार्च २०२३ रोजी आले होते. यानंतर हे पार्सल घेऊन बेलवलकर हे संशयित शेख याच्या सांगलीवाडीतील पत्त्यावर गेले.
बेलवलकर यांना बोलण्यात गुंतवून रेहान खान आणि त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी व्यक्तीने तीन पार्सलपैकी दोन पार्सल बेलवलकर यांच्या नजरेआड घेऊन जात त्यातील ८७ हजार १३६ रुपयांचे दोन आयफोन बाजूला काढले आणि त्याबदल्यात त्यात साबणाच्या वड्या भरून ते पार्सल पुन्हा बांधून परत दिले. बेलवलकर यांनी शेख याच्याकडून ते पार्सल परत घेत कंपनीला पाठविले होते.
काही दिवसांनी कंपनीकडे पार्सल पोहोचल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर शुक्रवारी बेलवलकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.