'बार्टी'चे गेले दोन वर्षांपासून अनुदान बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:32 AM2021-09-09T04:32:17+5:302021-09-09T04:32:17+5:30
सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)ला गेल्या दोन वर्षांपासून अनुदान न दिल्याची धक्कादायक माहिती समोर ...
सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)ला गेल्या दोन वर्षांपासून अनुदान न दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे, असे मत रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, बार्टीच्या धर्तीवर सुरू झालेल्य ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’ या दोन्ही संस्थांना भरभरून अनुदान दिले जात असताना दुसरीकडे राज्य सरकारने मागील दोन वर्षांपासून ‘बार्टी’चे अनुदान मात्र बंद केले आहे. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे सर्वांत जुन्या, प्रतिष्ठित व ऐतिहासिक वारसा असलेल्या ‘बार्टी’च्या बहुतांश योजना बंद पडल्या आहेत.
‘महाज्योती’ला १४८ कोटींची अनुदान मंजुरी मिळाली तर, १५ कोटी खात्यात जमा करण्यात आले. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला (सारथी) कोरोना काळातही ११ कोटींची मदत करून १३० कोटींच्या नवीन प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली, मात्र, ‘बार्टी’कडे दुर्लक्ष केले गेले. राज्य सरकार अनुसूचित जमातीच्या मुलांची सामजिक, शैक्षणिक आर्थिक गळचेपी करत आहे. याचा आम्ही निषेध करतो, असे वेटम म्हणाले.